जळगाव लाईव्ह ट्रेन न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील खोटे नगराजवळील वाटीकाश्रम समोरील राष्ट्रीय महामार्गावर भरधाव आयशरने धडक दिली. यात दुचाकीस्वार रस्त्यावर पडल्याने समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरच्या पुढच्या चाकाखाली आल्याने ३० वर्षीय तरुण जागीच ठार झाला तर त्याच्यासोबत असलेला त्याचा मित्र गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी ६ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता घडली आहे.
प्रशांत भागवत तायडे (वय-३०) रा. गहू खेडा ता.रावेर जि. जळगाव असे मयत तरूणाचे नाव आहे. तर जयेश द्वारकानाथ पाटील (वय-२३) रा. गहू खेडा ता. रावेर हा गंभीर जखमी झाला असून त्याला खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, प्रशांत तायडे आणि जयेश पाटील हे दोघे मित्र शुक्रवारी ६ जानेवारी रोजी सकाळी रावेर तालुक्यातील गहुखेडा येथून दुचाकी क्रमांक (एमएच १९ सीपी २३५५) बांभोरीकडे जाण्यासाठी निघाले. दुपारी १ वाजेच्या सुमारास खोटे नगर जवळील वाटिकाश्रम समोरील राष्ट्रीय महामार्गवर भरधाव आयशर क्रमांक (एमएच १९ सीवाय ८१६७)ने दुचाकीला मागून धडक दिली. त्यामुळे दुचाकीवरील दोघेजण रस्त्यावर पडले. तेवढ्यात समोरून खडीने भरलेले ट्रॅक्टर क्रमांक (एमएच १९ एएन २४३८) वाहना खाली प्रशांत तायडे आल्याने त्याच्या डोक्यावरून ट्रॅक्टरचे पुढचे चाक गेल्याने जागीच ठार झाला. तर मागे बसलेला त्याचा मित्र जयेश द्वारकानाथ पाटील हा गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा केला. यात जखमी झालेला जयेश पाटील याला तातडीने खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. तर मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला. शासकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. मयत प्रशांत तायडे यांच्या पश्चात आई साधना, वडील भागवत नागेश्वर तायडे आणि विवाहित बहीण असा परिवार आहे. एकुलता एक मुलगा गेल्याने तायडे कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.