नागपुरातील एका वसतीगृहात बिहारी विद्यार्थ्यांने घेतला टोकाचा निर्णय !

नागपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | व्हीएनआयटीच्या एका विद्यार्थ्यांने वसतिगृहात आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. या आत्महत्येमागील कारण स्पष्ट झालेले नसले तरी अंतिम वर्षात अनुत्तीर्ण झाल्यामुळे नैराश्यातून आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेने विद्यार्थ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

व्हीएनआयटीमध्ये मागील काही वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या घटना वाढल्या आहेत. दिव्यांशू रोहितकुमार गौतम असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो व्हीएनआयटीत कॉम्युटर सायन्सच्या अंतिम वर्षाला शिकत होता. या परिसरातील वसतिगृहात तो रहात होता. मूळचा परोरा, बिहार येथील होता. अंतिम वर्षाच्या परीक्षेत तो अनुत्तीर्ण झाल्याची माहिती आहे. त्यामुळे काही दिवसांआधी पुनर्रपरीक्षा देण्यासाठी व्हीएनआयटीमध्ये आला होता. मात्र, यावेळी त्याचे पेपर चांगले न गेल्यामुळे तो नैराश्यात असल्याची माहिती आहे. यातूनच त्याने दोन ते तीन दिवसांआधी आत्महत्या केली असावी अशी शंका आहे.

गुरुवारी सकाळी खोलीतून कुजलेला वास आल्याने विद्यार्थ्यांना शंका आली. त्यांनी दार ठोठावले, मात्र आतून प्रतिसाद आला नाही. त्यांनी तातडीने सुरक्षा अधिकाऱ्यांना कळविले. ते लगेचच तेथे आले. त्यांनी दिव्यांशूच्या खोलीचे दार महत्प्रयासाने उघडले. त्यानंतर मृतदेह खोलीमध्ये खाली जमिनीवर पडलेला दिसला. दिव्यांशूने खोलीतील पंख्याच्या हुकला लटकून आत्महत्या केली असावी, मात्र, मृतदेह त्यानंतर खाली पडला असावा असा अंदाज आहे. दिव्यांशू रोहितकुमार गौतम हा केवळ २२ वर्षांचा होता. त्याच्या आत्महत्येच्या घटनेने विद्यार्थ्यांमध्ये खळबळ उडाली. पोलिसांनी दिव्यांशूच्या आत्महत्येप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

Protected Content