Home राजकीय बिहार निवडणुका दोन टप्प्यात : ६ आणि ११ नोव्हेंबर रोजी मतदान, १४...

बिहार निवडणुका दोन टप्प्यात : ६ आणि ११ नोव्हेंबर रोजी मतदान, १४ नोव्हेंबरला निकाल


नवी दिल्ली – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बिहार विधानसभा निवडणुकांच्या तारखा अखेर जाहीर करण्यात आल्या असून, यंदाची निवडणूक दोन टप्प्यात पार पडणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रमुख ज्ञानेश कुमार यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या निवडणुकांसाठी एकूण ७ कोटी ४२ लाख मतदार मतदान करणार असून, १४ नोव्हेंबर २०२५ रोजी मतमोजणीनंतर निकाल घोषित केला जाईल.

पहिल्या टप्प्यातील मतदान ६ नोव्हेंबरला, तर दुसऱ्या टप्प्याचे मतदान ११ नोव्हेंबरला होणार आहे. या दोन टप्प्यांच्या निवडणुकांसाठी अनुक्रमे १० आणि १३ ऑक्टोबर रोजी अधिसूचना जारी केली जाणार आहे. उमेदवारांना अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख १७ ऑक्टोबर (पहिला टप्पा) आणि २० ऑक्टोबर (दुसरा टप्पा) अशी निश्चित करण्यात आली आहे. अर्ज छाननीसाठी अनुक्रमे १८ आणि २१ ऑक्टोबर, तर अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत २० आणि २३ ऑक्टोबर असेल.

बिहारमध्ये यंदा ७ कोटी ४२ लाख मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये ३ कोटी ९२ लाख पुरुष आणि ३ कोटी ५० लाख महिला मतदारांचा समावेश आहे. याशिवाय १४ लाख मतदार हे प्रथमच मतदान प्रक्रियेत सहभागी होणार आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर सरासरी १,२०० मतदार राहणार असून, सुविधा वाढवण्यासाठी आयोगाने खास तयारी केली आहे.

निवडणूक आयोगाने सर्व जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी आणि राजकीय पक्षांशी सविस्तर चर्चा केल्यानंतर निवडणूक तारखा निश्‍चित केल्या आहेत. निवडणुकीच्या पारदर्शकतेसाठी संपूर्ण प्रक्रिया थेट प्रक्षेपित केली जाणार असून, फेक न्यूज व अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही निवडणूक आयुक्तांनी दिला आहे.

मतदार यादीतील नावात बदल, नोंदणी किंवा सुधारणा मतदानाच्या १० दिवस आधीपर्यंत करता येणार आहे. अंतिम यादी ३० सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आली आहे. दिव्यांग आणि वृद्ध मतदारांसाठी रॅम्प, व्हीलचेअर आणि इतर सुविधा उपलब्ध असतील.

कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी आयोगाने “शून्य सहनशीलतेची” भूमिका घेतली असून, कोणत्याही प्रकारच्या हिंसाचारास थारा दिला जाणार नाही. मतदान केंद्रांवर अतिरिक्त सुरक्षा, सीसीटीव्ही निगराणी आणि तातडीच्या कारवाईसाठी विशेष यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे.


Protected Content

Play sound