Home आंतरराष्ट्रीय टी-२० विश्वचषकात मोठा उलटफेर; झिम्बाब्वेची ऑस्ट्रेलियावर २३ धावांनी मात

टी-२० विश्वचषकात मोठा उलटफेर; झिम्बाब्वेची ऑस्ट्रेलियावर २३ धावांनी मात


कोलंबो-वृत्तसेवा । टी-२० विश्वचषक स्पर्धेत पहिलाच मोठा उलटफेर पाहायला मिळाला असून झिम्बाब्वेने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला २३ धावांनी पराभूत करत ऐतिहासिक विजय मिळवला. हा झिम्बाब्वेचा टी-२० विश्वचषकातील दुसरा विजय ठरला आहे. यापूर्वी २००७ मध्येही त्यांनी लीग टप्प्यात ऑस्ट्रेलियावर मात केली होती.

कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियम येथे झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत २ गडी गमावून १६९ धावांचा भक्कम डोंगर उभारला. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा डाव १९.३ षटकांत १४६ धावांवर आटोपला.

झिम्बाब्वेकडून ब्रायन बेनेटने ५६ चेंडूत नाबाद ६४ धावांची खेळी साकारत संघाच्या डावाला आकार दिला. हे त्याचे टी-२० विश्वचषकातील पहिले आणि एकूण टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ११वे अर्धशतक ठरले. तादिवानाशे मारुमानी आणि रायन बर्ल यांनी प्रत्येकी ३५ धावांचे योगदान दिले. कर्णधार सिकंदर रझाने अवघ्या १३ चेंडूत नाबाद २५ धावा करत शेवटच्या षटकांत धावगती वाढवली.

ऑस्ट्रेलियाकडून मार्कस स्टोइनिस आणि कॅमेरॉन ग्रीन यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

१७० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात डळमळीत झाली. मॅट रेनशॉने ६५ धावांचे अर्धशतक झळकावत लढा दिला, तर ग्लेन मॅक्सवेलने ३१ धावांची खेळी केली. मात्र मार्कस स्टोइनिस (६), ट्रॅव्हिस हेड (१७), जोश इंग्लिस (८) यांना अपेक्षित कामगिरी करता आली नाही. टिम डेव्हिड आणि कॅमेरॉन ग्रीन शून्यावर बाद झाले.

झिम्बाब्वेच्या गोलंदाजांनी प्रभावी मारा करत ऑस्ट्रेलियाचा डाव गुंडाळला. ब्लेसिंग मुझाराबानीने ४ महत्त्वाच्या विकेट घेतल्या, तर ब्रॅडली इव्हान्सने ३ फलंदाज बाद करत विजयात मोलाची भूमिका बजावली. या पराभवामुळे ऑस्ट्रेलियाला स्पर्धेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का बसला असून झिम्बाब्वेने दमदार कामगिरी करत स्पर्धेत आपली ताकद दाखवून दिली आहे.


Protected Content

Play sound