जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आगामी विधानसभा निवडणुकीत राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन यांच्यावर भारतीय जनता पक्षाने मोठी जबाबदारी टाकली आहे.
विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून साधारणपणे दिवाळीच्या नंतर विधानसभा निवडणूक पार पडेल असे मानले जात आहे. यासाठी प्रत्येक पक्षाने मोर्चेबांधणी केली असून भाजपने यासाठी काटेकोर नियोजन केले आहे. यात राज्यातील सहा प्रमुख विभागांची जबाबदारी सहा मोठ्या नेत्यांवर देण्यात आलेली आहे. यात उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी ही ना. गिरीश महाजन यांच्याकडे सुपुर्द करण्यात आली आहे.
अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा जळगाव जिल्ह्यातील दोन्ही जागांचा अपवाद वगळता उर्वरित सहा जागांवर पराभव झाला आहे. यामुळे आगामी विधानसभा निवडणूक ही भाजपला सोपी नसेल असे चित्र आजपासूनच दिसून येत आहे. या पार्श्वभूमिवर, ना. गिरीश महाजन हे भारतीय जनता पक्षाला दणदणीत यश मिळवून देणार की, विधानसभेतही लोकसभेचीच पुनरावृत्ती होणार ? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, भाजपने मराठवाड्याची जबाबदारी खा. अशोक चव्हाण यांच्यावर, विदर्भाची चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर, कोकणाची रवींद्र चव्हाण यांच्यावर, मुंबई आशीष शेलार तर पश्चीम महाराष्ट्राची जबाबदारी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे सोपविली आहे.