मुंबई – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा। राज्यातील तसेच देशातील लाखो वाहनधारकांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट (HSRP) बसविण्यासाठी परिवहन विभागाने दिलेल्या अंतिम मुदतीत वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी १५ ऑगस्ट २०२५ ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली होती, मात्र नागरिकांकडून झालेल्या मर्यादित प्रतिसादामुळे ही मुदत आता ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे.
परिवहन विभागाच्या अधिकृत http://transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन वाहनधारकांना ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत अपॉइंटमेंट बुक करता येणार आहे. यानंतर, म्हणजेच १ डिसेंबर २०२५ पासून अशा वाहनांवर ज्यांनी HSRP नंबर प्लेट बसवलेली नसेल, त्यांच्यावर वाहतूक विभागाच्या वायुवेग पथकाद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तथापि, ३० नोव्हेंबरपूर्वी अपॉइंटमेंट बुक केलेल्या वाहनधारकांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असेही परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे.

सह परिवहन आयुक्त शैलेश कामत यांनी सांगितले की, १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसविणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे असे वाहनधारक लवकरात लवकर अपॉइंटमेंट घेऊन ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
एचएसआरपी नंबर प्लेट ही वाहनांच्या सुरक्षिततेसाठी आणि ओळखीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची मानली जाते. या प्लेटमध्ये विशिष्ट प्रकारचा होलोग्राम स्टिकर असतो, त्यावर वाहनाचा इंजिन आणि चेसिस क्रमांक प्रेशर मशिनने कोरलेला असतो. ही प्लेट एकदा फुटली की पुन्हा वापरता येत नाही आणि त्याची बनावट प्रत तयार करणेही अशक्य असते. यामुळे वाहन चोरी, बनावट नंबर प्लेट्सचा वापर आणि इतर गैरवापर रोखण्यासाठी HSRP एक प्रभावी उपाय मानला जातो.
एप्रिल २०१९ नंतर विकल्या गेलेल्या सर्व नवीन वाहनांना ही प्लेट बसविणे बंधनकारकच होते. आता २०१९ पूर्वीच्या वाहनांसाठीही तीच अट लागू करण्यात आली आहे. अपघात किंवा वाहतूक उल्लंघन झाल्यास वाहन ओळखण्याच्या प्रक्रियेत ही प्लेट प्रशासनासाठी उपयुक्त ठरते.



