मुंबई-वृत्तसेवा । मुंबईत स्वतःचे घर असावे, या स्वप्नाला आता नवी उभारी मिळाली आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा)च्या मुंबई मंडळातर्फे तब्बल 2640 सदनिकांच्या विक्रीसाठी लॉटरी जाहीर करण्यात आली असून, 30 मार्च 2026 पासून ऑनलाईन अर्ज प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. विविध उत्पन्न गटातील नागरिकांसाठी ही मोठी संधी मानली जात आहे.
मुंबईतील कन्नमवार नगर-विक्रोळी, पत्राचाळ सिद्धार्थ नगर-गोरेगाव, जुने मागाठाणे-बोरीवली, गोराई-बोरीवली, सुभाष नगर-चेंबुर, गांधीनगर-वांद्रे, पंतनगर-घाटकोपर, गिरगाव, वडाळा, कोपरी-पवई, माझगाव, तुंगा पवई, लोकमान्य नगर-दादर, पहाडी गोरेगाव, अँटॉप हिल-वडाळा आदी महत्त्वाच्या ठिकाणी ही घरे उपलब्ध असणार आहेत. या सोडतीची अधिकृत जाहिरात 30 मार्च रोजी विविध वृत्तपत्रांमध्ये तसेच म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार आहे. अर्ज प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देणारी पुस्तिका देखील ऑनलाइन उपलब्ध करून दिली जाणार आहे.

म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या हस्ते 30 मार्च रोजी ‘गो लाईव्ह’ कार्यक्रमाद्वारे या प्रक्रियेचा शुभारंभ केला जाणार आहे. दुपारी 3 वाजल्यापासून अर्ज नोंदणीसाठी लिंक उपलब्ध होईल. इच्छुक नागरिकांना 29 एप्रिल 2026 रात्री 11.59 वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहे, तर अनामत रकमेचा भरणा 30 एप्रिल 2026 पर्यंत स्वीकारला जाणार आहे. तसेच RTGS/NEFT द्वारेही बँकेच्या वेळेत रक्कम भरता येणार आहे.
सोडतीसाठी प्राप्त अर्जांची प्रारूप यादी 5 मे 2026 रोजी प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर अर्जदारांना 8 मेपर्यंत दावे आणि हरकती नोंदवण्याची संधी दिली जाईल. अंतिम यादी 12 मे रोजी जाहीर होणार असून, 15 मे 2026 रोजी सकाळी 11 वाजता सोडत काढण्यात येणार आहे. सोडतीचे ठिकाण नंतर जाहीर केले जाईल.
या लॉटरीत विविध उत्पन्न गटांसाठी स्वतंत्र कोटा ठेवण्यात आला आहे. अत्यल्प उत्पन्न गटासाठी 145 घरे, अल्प उत्पन्न गटासाठी 858 घरे, मध्यम उत्पन्न गटासाठी 1408 घरे आणि उच्च उत्पन्न गटासाठी 229 घरे उपलब्ध आहेत. यामध्ये म्हाडाच्या सुरू असलेल्या प्रकल्पांतील 1762 घरे, विविध पुनर्विकास योजनांमधून प्राप्त 371 आणि 188 घरे तसेच मागील सोडतीत न विकली गेलेली 319 घरे समाविष्ट आहेत. पुनर्विकास योजनांमधील घरे ‘जशी आहेत त्या स्थितीत’ विक्रीसाठी उपलब्ध असतील.



