मोठी बातमी : तीन दरोडेखोरांनी सराफा व्यावसायिकाला मारहाण करून लुटले


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यातील नरवेल फाटाजवळ सराफा व्यावसायिकाला तीन दरोडेखोरांनी अडवून धारदार वस्तूने वार करून त्यांच्याजवळील सोन्या-चांदीचे दागिने आणि ८ लाख रुपयांची रोकड असा एकूण १७ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जबरी लुटून नेल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. याबाबत मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अज्ञात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुक्ताईनगर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, निलेश वसंत सोनार (वय-३२) रा. नरवेल ता. मुक्ताईनगर जि. जळगाव हे सराफ व्यावसायिक आहे. त्यांचे मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदा येथे धनश्री ज्वेलर्स नावाचे दुकान असून ज्वेलर्स व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतात. बुधवार ३० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास निलेश सोनार हे त्यांचे दुचाकीने उचंदा येथील दुकान बंद करून घरी जात होते. त्यावेळेस नरवेल फाट्याजवळ अज्ञात तीन दरोडखोरांनी दुचाकीवर येऊन त्यांचा रस्ता अडविला. त्यांना धारदार शस्त्र व दगडाने मारहाण करून त्यांच्याजवडील ९ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, ८० हजार रुपये किमतीचे दोन किलो चांदीचे दागिने आणि ८ लाख रुपयांची रोकड असा १७ लाख ८० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जबरी लुटून नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या संदर्भात सराफा व्यावसायिक यांनी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे करीत आहे.