खडसे महाविद्यालयात जागतिक एड्स दिनानिमित्त कार्यशाळा उत्साहात   

 

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | श्रीमती जी. जी. खडसे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे जागतिक एड्स दिनानिमित्त कार्यशाळा संपन्न झाली.

या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.हेमंत महाजन उपस्थित होते तर मार्गदर्शक रितेश गवई (समुपदेशक, एचआयव्ही विभाग – उपजिल्हा रुग्णालय, मुक्ताईनगर) उपस्थित होते.

समुपदेशक गवई यांनी एचआयव्ही आजाराची कारणे, उपचार आणि प्रतिबंध याविषयी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसेच विद्यार्थ्याच्या मनातील प्रश्नांना उत्तरे देऊन विद्यार्थ्यांना समुपदेशन केले. याप्रसंगी उपजिल्हा रुग्णालय, मुक्ताईनगर येथील मैत्री क्लिनिकचे समुपदेशक सुमित तायडे यांनी जागतिक एड्स दिनाची विद्यार्थ्यांना शपथ देऊन तारुण्य अवस्थेतील मुलांच्या समस्या विषयीचे विवेचन करून शारीरिक आजारांसोबत मानसिक आरोग्याविषयी चर्चा केली. नीरज खाचणे (एचआयव्ही विभाग- लॅब टेक्निशन उपजिल्हा रुग्णालय, मुक्ताईनगर) यांनी एचआयव्ही आजारासंबंधी व जनजागृती संबंधी विविध पोस्टर्स दाखवून विद्यार्थ्यांना आत्मचिंतन करावयास भाग पाडले.

अध्यक्षीय मनोगतात प्रभारी प्राचार्य महाजन यांनी ‘आरोग्यम् धनसंपदा’ ही यशाची गुरुकिल्ली असून आपण सर्वांनी सदृढ राहावे आणि कोणत्याही आजाराला बळी पडू नये अशी सद्-भावना व्यक्त केली.महाविद्यालयाचे विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. संजीव साळवे यांनी एचआयव्ही आजार हा दिवसेंदिवस वेगाने वाढत असून आपण प्रत्येकांनी जागरूक राहणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन केले.

या संपूर्ण कार्यशाळेचे संयोजन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अनिल पाटील, ग्रंथालय अधीक्षक प्रा. सरोदे, विद्यार्थी विकास महिला अधिकारी प्रा. डॉ. प्रतिभा ढाके,एनएसएस कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ. दीपक बावस्कर यांनी केले. या कार्यशाळेत एचआयव्ही जनजागृतीचे ब्रँड अँबेसिडर म्हणून कुणाल भारंबे या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. फोटोग्राफीचे कार्य निर्मल पाटील यांनी केले. या कार्यशाळेचे सूत्रसंचालन चेतन मोरे यांनी, प्रास्ताविक एनएसएस कार्यक्रमाधिकारी प्रा. विजय डांगे तर आभार प्रदर्शन एनएसएस महिला कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. ताहिरा मीर मॅडम यांनी केले. या कार्यशाळेत महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी व कर्मचारी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता.

Protected Content