मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आगामी महापालिका, नगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांसाठी करण्यात आलेल्या प्रभाग तसेच गट आणि गण रद्द कराव्यात अशी मागणी आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून केली आहे यामुळे मविआच्या निर्णयांना धक्का बसला असून निवडणुका पुढे ढकलण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महाविकास आघाडी सरकारने आधीच्या फडणवीस यांच्या सरकारचा नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडून येण्याचा निर्णय रद्द करत पुन्हा एकदा नगरसेवकांच्या बहुमतातून निवडीचा निर्णय घेतला होता. यानुसार राज्यातील बर्याच नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या. तर आधीच्या सरकारचा निर्णय फिरवून दोन सदस्यीय प्रभाग रचनेचा नियमदेखील अंमलात आणला होता. यासोबत अलीकडेच राज्यातील नगरपालिका, महापालिका यांच्यासाठी प्रभाग रचना तर पंचायत समितीसाठी गण आणि जिल्हा परिषदांसाठी गटांची रचना जाहीर करण्यात आली होती. मात्र यात मविआतील पक्षांची सुविधा लक्षात घेण्यात आली असल्याचा आरोप करण्यात आला होता.
राज्यात एकनाथ शिंदे यांचे सरकार सत्तारूढ होताच भाजपचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी आधीप्रमाणेच जनतेतून नगराध्यक्ष निवडून यावा अशी अपेक्षा व्यक्त केली होती. तर, आता त्यांनी यासाठी निवडणूक आयोगाला पत्र लिहले आहे. यात जनतेतून नगराध्यक्ष निवडून यावा यासह अलीकडेच जाहीर करण्यात आलेली प्रभाग, गट आणि गण रचना रद्द करून ही प्रक्रिया नव्याने राबविण्याची मागणी केली आहे. राज्यात शिंदे गट व भाजपचे सरकार असल्यामुळे बावनकुळे यांची मागणी मान्य होण्याची शक्यता आहे. परिणामी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात येण्याची शक्यता आता बळावली आहे.