मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सहा टप्प्यांसाठी मतदान झाले आहे, तर उर्वरीत एका टप्प्यासाठी एक जून रोजी मतदान होणार आहे. तर चार जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले असतानाच आता मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे दिवाळीपूर्वीच राज्यात विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणूक ऑक्टोबरमध्ये होऊ शकते, अशी माहिती समोर येत आहे. 2019 मध्ये 21 ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले होते.
लोकसभा निवडणुकीच्या निकालाची उत्कंठा असतानाच राज्यात विधानसभा निवडणुकीचे वाजे वाजू लागले आहेत. महाराष्ट्रात विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. तर हरियाणाची मुदत 3 नोव्हेंबरपर्यंत आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी म्हणजे ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होण्याची शक्यता आहे.
विधानसभेची मुदत संपण्यापूर्वी किंवा त्या तारखेच्या दुसऱ्या दिवशी नवी विधानसभा अस्तित्वात येणे आवश्यक असते. यानुसार हरियाणा विधानसभा ४ नोव्हेंबरला अस्तित्वात येणे आवश्यक आहे. महाराष्ट्र आणि हरियाणाची विधानसभा निवडणूक 2009 पासून एकाच वेळी होत आहे. दोन्ही विधानसभांची मुदत 23 दिवसांच्या अंतराने संपत असल्यामुळे नियमानुसार एकत्र निवडणूक घेणे आवश्यक आहे. यंदा दिवाळी 29 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर या कालावधीत आहे. सणासुदीच्या काळात निवडणुका घेतल्या जात नाहीत. हरियाणामुळे महाराष्ट्रातही आधी निवडणूक घ्यावी लागणार आहे. 2019 मध्ये महाराष्ट्र आणि हरयाणामध्ये 21 ऑक्टोबरला मतदान झाले होते. यंदाही याच तारखेच्या आसपास, 21 ते 26 ऑक्टोबरदरम्यान मतदानाची शक्यता आहे.