जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरात एका व्यवसायिकाच्या कार्यालयावर दरोडा टाकून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे नेते विनोद देशमुख यांना मंगळवारी मध्यरात्री अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, २०२२ साली दाखल झालेल्या या गुन्ह्यात तब्बल दोन ते तीन वर्षांनंतर ही कारवाई झाल्याने जळगावच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. विनोद देशमुख हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात, त्यामुळे या अटकेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
व्यवसायिक तथा फिर्यादी मनोज वाणी यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन पोलिसांवर गंभीर आरोप केला होता. “उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दबावामुळे पोलीस आरोपींना अटक करत नाहीत,” असा आरोप त्यांनी जाहीरपणे केला होता. या आरोपानंतर अवघ्या काही दिवसांतच रामानंद नगर पोलिसांनी ही कारवाई करत देशमुख यांना अटक केली आहे.

२०२२ मध्ये दाखल झालेल्या या गुन्ह्यात विनोद देशमुख यांच्यासह इतर काही आरोपींचा समावेश होता. या प्रकरणात देशमुख यांच्यावर कार्यालयात घुसून दरोडा टाकणे आणि फिर्यादीला धमकावण्याचे आरोप आहेत. गुन्हा दाखल झाल्यापासून पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते, मात्र आरोपींना अटक होत नसल्याने पीडित व्यावसायिक नाराज होते.
वाणी यांच्या पत्रकार परिषदेनंतर प्रशासनावर दबाव वाढला आणि अखेर पोलिसांनी मध्यरात्रीच्या सुमारास ही कारवाई केली. विनोद देशमुख यांना अटक केल्यानंतर दुपारनंतर न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या अटकेमुळे जळगाव जिल्ह्यातील राजकारणात अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जवळच्या नेत्यावर ही कारवाई झाल्याने या प्रकरणाला आता राजकीय रंगही चढण्याची शक्यता आहे.



