जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । टी-20 विश्वचषक 2026 च्या तयारीला अंतिम टप्प्यात वेग आला असतानाच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. विश्वचषकाच्या वेळापत्रकात बदल होणार का, बांगलादेशचा सहभाग कायम राहणार का, याबाबत गेल्या काही दिवसांपासून बंद दाराआड जोरदार हालचाली सुरू होत्या. आता या सर्व चर्चांना निर्णायक वळण लागण्याची चिन्हे दिसत असून आयसीसीकडून लवकरच मोठी आणि ‘गेमचेंजर’ घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

टी-20 विश्वचषक खेळण्यासाठी भारतात येण्यास बांगलादेशने स्पष्ट नकार दिल्याने आयसीसीसमोर मोठा पेच निर्माण झाला होता. आयसीसीने दोन दिवसांपूर्वी बांगलादेश क्रिकेट बोर्डाला स्पष्ट शब्दांत कळवले होते की, विश्वचषकातील सामने खेळायचे असतील तर भारतात येऊनच खेळावे लागेल. यासाठी एक दिवसाची अंतिम मुदत देण्यात आली होती. मात्र ही मुदत संपूनही बांगलादेशने आपली भूमिका बदललेली नाही. बांगलादेशला श्रीलंकेत सामने खेळायचे होते, परंतु या पर्यायावर कोणताही तोडगा न निघाल्याने त्यांचा सहभाग धोक्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर आयसीसीने बांगलादेशला स्पर्धेतून वगळण्याचा निर्णय जवळपास निश्चित केला असल्याची चर्चा आहे. बांगलादेशच्या जागी कोणत्या संघाला संधी दिली जाणार, याबाबतही चित्र स्पष्ट होत आहे. सध्याच्या रिपोर्टनुसार, स्कॉटलंडला टी-20 विश्वचषक 2026 मध्ये खेळण्याची सुवर्णसंधी मिळण्याची दाट शक्यता आहे. स्कॉटलंडने यापूर्वी पात्रता फेरी खेळली होती, मात्र ते पात्र ठरू शकले नव्हते. आता बांगलादेश बाहेर पडल्यास स्कॉटलंडची ‘लकी एंट्री’ होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
आयसीसीकडून अधिकृत घोषणा होणे केवळ बाकी असून, स्कॉटलंडचा समावेश त्याच गटात केला जाईल, ज्यामध्ये बांगलादेशचा समावेश होता. विश्वचषक सुरू होण्यासाठी अवघे 15 दिवस शिल्लक असल्याने स्कॉटलंडला तातडीने आपला संघ जाहीर करून सरावाला सुरुवात करावी लागणार आहे.
दरम्यान, टी-20 विश्वचषकाच्या वेळापत्रकात कोणताही बदल होणार नसल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. बांगलादेशचे जे सामने नियोजित होते, तेच सामने आता स्कॉटलंड खेळेल, अशी शक्यता आहे. बांगलादेशचा पहिला सामना 7 फेब्रुवारी रोजी उद्घाटनाच्या दिवशी कोलकात्यात वेस्ट इंडिजविरुद्ध नियोजित होता. हा सामना दुपारी 3 वाजता खेळवला जाणार असून, तोच सामना आता स्कॉटलंड खेळेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
टी-20 विश्वचषक 2026 च्या पहिल्याच दिवशी क्रिकेटप्रेमींना तिहेरी थरार पाहायला मिळणार आहे. उद्घाटनाच्या दिवशी सकाळी 11 वाजता कोलंबो येथे पाकिस्तान आणि नेदरलँड्स यांच्यात सामना होईल. दुपारी 3 वाजता कोलकात्यात वेस्ट इंडिजचा सामना खेळवला जाईल, तर संध्याकाळी 7 वाजता मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारत आणि अमेरिका (USA) यांच्यात दिवसातील सर्वात मोठा सामना रंगणार आहे.



