मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । नवनियुक्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मंगळवारी १० फेब्रुवारी रोजी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहभाग घेतला. या बैठकीत राज्याच्या विकासाच्या दृष्टीने अनेक क्रांतिकारी निर्णय घेण्यात आले असून, मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना या निर्णयांची सविस्तर माहिती दिली.
पुरंदर विमानतळ आणि ‘तिसरी मुंबई’ला बळ :
पुणेकरांचे स्वप्न असलेल्या पुरंदर येथील विमानतळाच्या निर्मितीसाठी आज मंत्रिमंडळाने भूमी अधिग्रहणास (Land Acquisition) अधिकृत मान्यता दिली आहे. या प्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या निधी उभारणीलाही मंजुरी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या विमानतळासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत, त्यापैकी ९६ टक्के लोकांनी स्वेच्छेने जमिनी देण्यास संमती दर्शवली आहे.

तिसरी मुंबईची संकल्पना :
दुसरीकडे, ‘तिसरी मुंबई’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. अटल सेतूच्या जवळ एमएमआरडीएला (MMRDA) प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून नियुक्त केलेल्या जागेवर आता सिडको आणि एमआयडीसीचे नियम लागू करून जमीन अधिग्रहण करता येईल. या निर्णयामुळे मुंबईच्या शेजारील परिसराच्या विकासाला मोठी गती मिळणार आहे.
जलसंपदा आणि पायाभूत सुविधांसाठी निधी :
राज्यातील सिंचन व्यवस्था सक्षम करण्यासाठी जलसंपदा विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील अपूर्ण असलेले ४० प्रकल्प आणि १०० कालव्यांचे काम पूर्ण करण्यासाठी १५ हजार कोटी रुपयांचे दीर्घ मुदतीचे कर्ज घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. पुढील एक ते दोन वर्षांत हे सर्व प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे.
अजितदादांच्या स्मृतींना अभिवादन :
दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर झालेली ही पहिलीच बैठक असल्याने, त्यांनी सुचवलेल्या महत्त्वाच्या कामांवर मुख्यमंत्र्यांनी शिक्कामोर्तब केले. बारामती येथे ७५ कोटी रुपयांचे भव्य क्रीडा संकुल उभारण्यास मान्यता देण्यात आली, तर वालचंदनगर – रत्नापूर MIDC साठी १००० एकर जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच, राज्यात प्रशासकीय कामाचा वेग वाढवण्यासाठी ११ अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मागणीनुसार, विधिमंडळ परिसरात दिवंगत अजितदादा पवार यांचे तैलचित्र लावण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी मान्य केले आहे. आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी हे तैलचित्र लावले जाईल.



