दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांच्या कुटुंबाने आज मोठा निर्णय घेतला. सीताराम येचुरी यांच्या निधनानंतर त्यांचा मृतदेह नवी दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस यांना अभ्यास आणि संशोधनासाठी दान केला आहे. येचुरी यांचा आज वयाच्या ७२ व्या वर्षी दुपारी ३ वाजून ५ मिनिटांनी श्वसनाच्या गंभीर संसर्गामुळे निधन झाले.
सीपीआय(एम) सरचिटणीस १९ ऑगस्टपासून एम्समध्ये उपचार घेत होते. त्यांना न्यूमोनिया झाल्याने रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल केले होते. दिवसेंदिवस त्यांची प्रकृती चिंताजनक होत होती. परंतु, उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. एम्स रुग्णालयाने यासंदर्भातील मेडिकल बुलेटिन जारी केले. यामध्ये लिहिले होते की, सीताराम येचुरी यांना १९ ऑगस्ट रोजी न्युमोनिया झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, १२ सप्टेंबर रोजी दुपारी ३.०५ वाजता त्यांचे निधन झाले. त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा मृतदेह एम्स रुग्णालयाला अध्यापन आणि संशोधनासाठी दिला आहे.