Home क्राईम रोहित शेट्टींच्या घरावर गोळीबारानंतर मोठा निर्णय ; सर्व प्लॅन्स रद्द 

रोहित शेट्टींच्या घरावर गोळीबारानंतर मोठा निर्णय ; सर्व प्लॅन्स रद्द 


मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे. जुहू परिसरातील त्यांच्या इमारतीबाहेर काल रात्री एका अज्ञात व्यक्तीने चार ते पाच राऊंड फायर केल्याची माहिती समोर आली असून, सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. घटनेच्या वेळी रोहित शेट्टी स्वतः घरातच उपस्थित होते, ही बाब समोर आल्यानंतर चाहत्यांसह संपूर्ण मनोरंजन विश्वात चिंता व्यक्त केली जात आहे.

या गोळीबाराची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित व्यक्तींनी घेतल्याचा दावा करण्यात आला आहे. सोशल मीडियावर टाकण्यात आलेल्या पोस्टद्वारे शुभम लोणकर, आरजू बिश्नोई आणि हरी बॉक्सर यांनी या घटनेची जबाबदारी स्वीकारली असल्याचे सांगितले जात आहे. शुभम लोणकर हा बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात वॉन्टेड असलेला गँगस्टर असल्याची माहितीही पुढे आली आहे. धमकीच्या संदेशात रोहित शेट्टी यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील, असे थेट शब्दांत लिहिण्यात आल्याने प्रकरण अधिक गंभीर बनले आहे.

गोळीबारानंतर रोहित शेट्टी यांनी तातडीने मोठा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पुढील दोन दिवसांचे सर्व वैयक्तिक आणि व्यावसायिक प्लॅन्स त्यांनी रद्द केले असून, घरात ये-जा मर्यादित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, त्यांनी आपला जवळचा मित्र आणि अभिनेता अजय देवगण यालाही किमान पुढील 48 तास घरी न येण्याची विनंती केली असल्याचे समजते. सध्या ते पत्नी आणि आईसोबतच घरात राहत असून कुटुंबाच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, रोहित शेट्टी मुंबई पोलिसांना संपूर्ण सहकार्य करत असून आपला जबाब नोंदवत आहेत. तपास प्रक्रियेत ते सक्रियपणे सहभागी आहेत. घराची आणि परिसराची सुरक्षा वाढवण्यात आली असून, चित्रपटसृष्टीतील मित्र आणि सहकाऱ्यांना प्रत्यक्ष भेट टाळण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. सध्या ते आपल्या जवळच्या लोकांशी फोन आणि मेसेजद्वारेच संवाद साधत आहेत.

या घटनेनंतर बॉलिवूडमधील सेलिब्रिटींच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. रोहित शेट्टी हे अजय देवगण, अक्षय कुमार, सलमान खान आणि शाहरुख खान यांसारख्या दिग्गज कलाकारांचे जवळचे मित्र म्हणून ओळखले जातात. याआधीही सलमान खान, एल्विश यादव आणि दिशा पटानी यांच्या घराबाहेर तसेच कपिल शर्माच्या कॅनडातील कॅफेवर गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. अशा वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे सेलिब्रिटींच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


Protected Content

Play sound