Home Cities जळगाव ठाकरे गटाला मोठा झटका: युवा सेनेच्या महानगर प्रमुखांसह ३०० कार्यकर्ते शिंदे गटात...

ठाकरे गटाला मोठा झटका: युवा सेनेच्या महानगर प्रमुखांसह ३०० कार्यकर्ते शिंदे गटात दाखल

0
182

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आगामी महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जळगावात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. ठाकरे गटाच्या युवासेनेचे महानगर प्रमुख यश सपकाळे आणि गजू कोळी यांच्यासह सुमारे ३०० हून अधिक कार्यकर्त्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला आहे.

जळगावातील सरदार वल्लभभाई पटेल लेवा भवनात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे आणि महानगराध्यक्ष संतोष पाटील हे उपस्थित होते.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर युवा सेनेतील सक्रिय पदाधिकाऱ्यांनी केलेल्या या प्रवेशामुळे जळगावातील उद्धव ठाकरे गटाचे संघटन काही प्रमाणात खिळखिळे झाले आहे. दुसरीकडे, शिंदे गटाची ताकद वाढली असून आगामी निवडणुकांमध्ये पक्षाच्या संघटनात्मक कार्याला यामुळे मोठे बळ मिळेल असा विश्वास स्थानिक नेत्यांनी व्यक्त केला आहे.

प्रवेश करणाऱ्या नवनियुक्त कार्यकर्त्यांनी यावेळी बोलताना पक्षाचे संघटन अधिकाधिक मजबूत करू आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवू, असे आश्वासन दिले. मंत्री गुलाबराव पाटील यांनी या सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत करत त्यांच्यावर स्थानिक पातळीवर नव्या जबाबदाऱ्या सोपविण्यात येतील, असे नमूद केले. युवा सेनेच्या प्रमुख नेत्यांनीच शिंदे गटाची वाट धरल्यामुळे जळगावातील आगामी राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत.


Protected Content

Play sound