विदर्भात भाजपला मोठा धक्का; माजी खासदार काँग्रेसमध्ये

भंडारा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार शिशुपाल पटले हे काँग्रेस पक्षात प्रवेश करणार या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. पटले यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पटले यांच्या काँग्रेस प्रवेशाने भाजपला मोठा धक्का बसणार असल्याचे बोलले जात आहे.

भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात शिशुपाल पटले मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे पूर्व विदर्भात काँग्रेस पक्ष संघटना अधिक मजबूत होणार आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज टिळक भवन येथे शिशुपाल पटले यांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले. यावेळी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, तुमसरचे माजी आमदार अनिल बावनकर यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना शिशुपाल पटले म्हणाले की, आपण अनेक वर्ष भारतीय जनता पक्षात काम केले पण आता तो भाजपा राहिला नाही. तो आता तो आता व्यापारी आणि ठेकेदारांचा पक्ष झाला आहे. या पक्षाला शेतकरी सर्वसामान्य जनतेशी काही देणेघेणे राहिलेले नाही. ईडी सीबीआय यासारख्या संस्थांचा गैरवापर करून विरोधी पक्ष फोडण्याचे घृणास्पद प्रकार करून सत्ता मिळवण्याचा हव्यास आपल्यासारख्या कार्यकर्त्यांना आवडलेला नाही. या देशातील आणि राज्यातील जनतेला न्याय देण्याचे आणि राज्याला पुढे घेऊन जाण्याचे काम काँग्रेस पक्षच करू शकतो, त्यामुळेच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे असे शिशुपाल पटले म्हणाले.

 

Protected Content