मुक्ताईनगर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगरातील सियाराम ढाब्याजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना गुरूवारी सायंकाळी घडली आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनावरील चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, हा अपघात नसून घातपातची शक्यता आहे अशी चर्चा नागरीकांमध्ये असल्याने आमदार चंद्रकांत पाटील यांनी या घटनेची चौकशी करण्यात यावी असे आदेश देण्यात आले आहे. निलेश सुपडू डवले वय २८ रा. मुक्ताईनगर असे मयत दुचाकीस्वाराचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, निलेश डवले हा तरूण गुरूवारी १२ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता त्यांचा ओळखी दिपक राजपूत यांची दुचाकी क्रमांक (एमएच १९ डीपी ७४७७) घेवून बाहेर गेला होता. दरम्यान भुसावळ रोडवरील सियाराम ढाब्याजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील निलेश डवले हा तरूण ठार झाला आहे. अपघात होताच अज्ञात वाहनधारक हा वाहन घेवून पसार झाला. याप्रकरणी मयताचा भाऊ मुकेश डवले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनावरील चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र चाटे हे करीत आहे.
हा अपघात नसून घातपात असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान या घटनेची चौकशी करण्यात यावी अशी मागणी आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.