भुसावळ | लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरासाठी अभिमानास्पद बातमी असून येथील आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावलेले धावपटू विजय फिरके यांची ४ जानेवारी २०२६ रोजी रत्नागिरी येथे होणाऱ्या कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन २०२६ स्पर्धेसाठी ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्र पर्यटन, एमटीडीसी तसेच सुवर्णसूर्य फाउंडेशन, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणाऱ्या या मॅरेथॉनचे हे तिसरे वर्ष असून ५ किमी, १० किमी आणि २१ किमी अशा विविध अंतरांच्या धाव स्पर्धांचा यात समावेश आहे. “एक धाव मराठी भाषेसाठी” हा या उपक्रमाचा मुख्य संदेश असून क्रीडा, आरोग्य आणि मराठी भाषेच्या प्रचारासाठी ही स्पर्धा ओळखली जाते.

विजय फिरके हे गेल्या अनेक वर्षांपासून धावणे, सायकलिंग आणि ट्रायथलॉन क्षेत्रात सातत्यपूर्ण कामगिरी करत आहेत. त्यांनी हाफ आयर्न मॅन (पुणे) स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण केली असून ६२ किमी खारडुंगला अल्ट्रा मॅरेथॉन (लेह-लडाख), ६७ किमी कॉम्बॅट मॅरेथॉन (दक्षिण आफ्रिका), ७५ किमी उटी अल्ट्रा मॅरेथॉन, ६५ किमी कास अल्ट्रा मॅरेथॉन यांसारख्या कठीण स्पर्धांमध्ये त्यांनी सहभाग घेतला आहे.
तसेच त्यांनी पुणे मॅरेथॉन ९ वेळा, टाटा अल्ट्रा मॅरेथॉन ४ वेळा, हाफ मॅरेथॉन ९ वेळा पूर्ण केल्या असून पुणे मॅरेथॉनमधील त्यांचा वैयक्तिक सर्वोत्तम वेळ ३ तास ५५ मिनिटे आहे.
सायकलिंगमध्येही विजय फिरके यांची कामगिरी उल्लेखनीय असून त्यांनी १२०० किमी सायकलिंग ४२ तासांत, तसेच १००० किमी, ६०० किमी, ४०० किमी BRM आणि SR राईड्स यशस्वीरीत्या पूर्ण केल्या आहेत. आतापर्यंत त्यांनी ६००० किमी रनिंग, २४,००० किमी सायकलिंग आणि ९३०० ते ९८०० किमी स्विमिंग असा अफाट प्रवास केला आहे.
दीर्घकाळ सातत्याने केलेला सराव, शिस्तबद्ध जीवनशैली आणि सामाजिक उपक्रमांतील सक्रिय सहभाग यामुळेच विजय फिरके यांची या स्पर्धेसाठी ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवड करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. त्यांच्या माध्यमातून युवकांना धावण्याकडे, आरोग्यपूर्ण जीवनशैलीकडे आणि मराठी भाषेच्या संवर्धनाकडे प्रेरित करण्याचा आयोजकांचा मानस आहे.
या निवडीबद्दल विजय फिरके यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून भुसावळ शहराचे नाव राज्यपातळीवर उज्ज्वल करणाऱ्या या यशाबद्दल क्रीडाप्रेमी, मित्रपरिवार आणि नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.



