Home करियर भुसावळकर जितेश पाटील यांची तेलंगणा राज्य वीज वितरण कंपनीच्या सीएमडी पदी नियुक्ती

भुसावळकर जितेश पाटील यांची तेलंगणा राज्य वीज वितरण कंपनीच्या सीएमडी पदी नियुक्ती


भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भुसावळ शहरासाठी अभिमानाची बाब ठरणारी बातमी समोर आली आहे. भुसावळचे सुपुत्र आणि आयएएस अधिकारी जितेश पाटील यांची तेलंगणा सरकारने तेलंगणा राज्य वीज वितरण कंपनीच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती केली आहे. त्यांच्या या निवडीमुळे जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

२०१६ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेल्या जितेश पाटील यांनी प्रशासकीय सेवेत उल्लेखनीय कामगिरी करत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. यापूर्वी त्यांनी तेलंगणा राज्यातील भद्रादी कोठागुडेम येथे जिल्हाधिकारी म्हणून काम करताना विविध विकासकामे आणि प्रभावी प्रशासनासाठी कौतुक मिळवले होते. त्यांच्या प्रशासकीय अनुभव आणि नेतृत्वक्षमतेचा विचार करून तेलंगणा सरकारने त्यांच्यावर आता वीज वितरण कंपनीच्या सर्वोच्च पदाची जबाबदारी सोपवली आहे.

जितेश पाटील यांचे मूळ गाव कर्जोद (ता. रावेर) असून सध्या त्यांचे कुटुंब समृद्धी पार्क, सुरभी नगर, भुसावळ येथे वास्तव्यास आहे. ते भाभा अणुशक्ती केंद्राचे सेवानिवृत्त कर्मचारी आणि जय गणेश फाउंडेशनचे सक्रिय पदाधिकारी विश्वनाथ पाटील यांचे सुपुत्र आहेत.

मध्यमवर्गीय कुटुंबातून शिक्षण घेत आयएएसपर्यंतचा प्रवास करणारे आणि आता राज्याच्या वीज वितरण कंपनीचे नेतृत्व करणारे जितेश पाटील हे आजच्या तरुणांसाठी प्रेरणादायी उदाहरण ठरले आहेत. त्यांच्या या यशामुळे भुसावळ शहरासह रावेर तालुक्यात आनंदाचे वातावरण असून नागरिकांनी त्यांचे अभिनंदन करत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.


Protected Content

Play sound