भुसावळ संतोष शेलोडे | माजी आमदार संतोष चौधरी यांनी आज राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्हा निरिक्षकांच्या उपस्थितीतील महत्वाच्या आढावा बैठकीकडे पाठ फिरवल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. त्यांचे बंधू अनिल चौधरी यांनी अलीकडेच प्रहार जनशक्तीचा झेंडा हाती घेतला असून आता संतोषभाऊ देखील याच विचारात आहे का ? ते पक्षावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करताय की त्यांच्या डोक्यात अजून नवीनच काही शिजत आहे ? याबाबत आता चर्चांना उधाण आले आहे.
माजी आमदार संतोष चौधरी आणि त्यांचे पुत्र सचिन चौधरी हे सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये कार्यरत आहेत. चौधरी यांनी अलीकडच्या काळात जळगावातील पक्षाच्या कार्यक्रमांना आवर्जून हजेरी लावली आहे. या पार्श्वभूमिवर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा निरिक्षक अविनाश आदिक यांच्या उपस्थितीत आज शहरात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. विद्यमान जिल्हा निरिक्षक हे पहिल्यांदाच जिल्ह्यात येत असल्यामुळे या आढावा बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून होते. चौधरी समर्थक असणारे शहराध्यक्ष नितीन धांडे आणि त्यांच्या सहकार्यांनी या बैठकीचे आयोजन केले. यात मुख्य फलकावर जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन चौधरी यांचे छायाचित्र देखील लावण्यात आले होते. मात्र आजच्या आढावा बैठकीला या दोघांची उपस्थिती नव्हती. यातील रोहिणीताई या सध्या खडसे फॅमिली अडचणीत असल्याने या बैठकीला उपस्थित राहू शकले नसल्याचे मानले जात आहे. तथापि, सचिन चौधरी आणि त्या पेक्षा देखील संतोषभाऊ चौधरी यांनी या बैठकीकडे पाठ फिरवल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
संतोष चौधरी यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत शिवसेना, राष्ट्रवादी, पुन्हा शिवसेना आणि पुन्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस असा प्रवास केला आहे. सध्या ते राष्ट्रवादीत स्थिरावल्याचे मानले जात असतांना त्यांनी आज आपल्याच बालेकिल्ल्यातील महत्वाच्या बैठकीला दांडी मारल्याने चर्चेला उधाण न आल्यास नवलच ! तसे म्हटले तर या बैठकीला रोहिणी खडसे नसल्या तरी नाथाभाऊंचे कट्टर समर्थक प्रा. सुनील नेवे आवर्जून उपस्थित होते. तर संतोष चौधरी यांचे देखील काही समर्थक उपस्थित होते. यामुळे चौधरी यांनी या बैठकीकडे पाठ फिरवल्याचे कारण काय ? हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. त्यांच्या मनात काही नवीन तर आले नाही ना ? ही चर्चा आता सुरू झाली आहे.
संतोषभाऊंचे बंधू अनिल चौधरी यांनी अलीकडेच प्रहार जनशक्ती या पक्षाचा झेंडा हाती घेऊन यावल-रावेर मतदारसंघाच चांगली मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आगामी नगरपालिका निवडणुकीत ते शक्ती प्रदर्शनाच्या तयारीत आहेत. भुसावळ शहरातही चौधरी समर्थक हे प्रहार जनशक्तीच्या चिन्हावर लढण्याची शक्यता असल्याची चर्चा मध्यंतरी सुरू होती. संतोषभाऊ आणि त्यांचे पुत्र सचिन यांच्या आजच्या अनुपस्थितीमुळे या चर्चेला आता बळ मिळाले आहे. आगामी नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे सूत्रे ही पूर्णपणे नाथाभाऊंच्या हाती राहण्याची शक्यता असल्याने संतोष चौधरी हे यावर मात करण्याचा प्रयत्न करतील हे निश्चीत असल्याने ते हाताशी एक पर्याय म्हणून प्रहार जनशक्तीचा वापर करण्याची शक्यता आहे. अन्यथा आज पाठ फिरवून त्यांनी थेट पक्षालाच आव्हान दिल्याचाही संकेत दिला आहे. अर्थात, हा एक प्रकारच्या दबावतंत्राचाच भाग असण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
दरम्यान, आजच्या मेळाव्यात चौधरी पिता-पुत्राच्या गैरहजेरीची पक्षाचे जिल्हा निरिक्षक अविनाश आदिक यांनी जराही दखल घेतली नाही. नाथाभाऊंच्या आगमनामुळे राष्ट्रवादीला बळकटी येणार असल्याचा पुनरूच्चार त्यांनी आपल्या भाषणातून अनेकदा केला. मात्र ते चौधरी कुटुंबाविषयी चकार शब्ददेखील बोलले नाहीत. यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस व चौधरी कुटुंबाच्या संबंधात कुठे तरी मिठाचा खडा पडला का ? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. परिणामी आजची चौधरी पिता-पुत्रांची नाराजी ही आगामी काळातील राजकीय उलथा-पालथीचे संकेत आहे की दबावतंत्र ? हे लवकरच स्पष्ट होणार आहे. मात्र आजची त्यांनी मारलेली दांडी ही भल्याभल्यांच्या डोक्याला खुराक लाऊन गेलीय हे मात्र निश्चीत…!