भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | ”शिवसेनेसाठी बंडखोरी नवीन नाही. यामुळे कुणीही पक्षातून गेल्याने काही होणार नाही. यातच आता ‘घाण’ निघून गेल्याने नव्यांना संधी मिळणार !” अशा शब्दांमध्ये शिवसेना संपर्क प्रमुख विलास पारकर यांनी फुटीरांवर हल्लाबोल केला. ते शहरात आयोजीत पक्षाच्या मेळाव्यात बोलत होते.
येथील ब्राह्मण संघात शिवसेनेच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी रावेर लोकसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख विलास पारकर तर प्रमुख उपस्थित म्हणून जिल्हाप्रमुख समाधान महाजन, उपजिल्हाप्रमुख प्रा. उत्तम सुरवाडे, जामनेरचे संपर्क प्रमुख श्रीकांत पाटील, जिल्हाप्रमुख समाधान महाजन, गजानन मालपूरे, उपजिल्हाप्रमुख मनोहर पाटील, प्रा. उत्तम सुरवाडे, विधानसभा क्षेत्र प्रमुख संतोष सोनवणे, ऍड.मनोहर खैरनार, अल्पसंख्यांक जिल्हा संघटक सय्यद जाफर अली, शिक्षक सेनेचे इलियास शेख, तालुका संघटक प्रा.धीरज पाटील, शहरप्रमुख बबलू बर्हाटे, ललित मुथा, वरणगाव शहरप्रमुख संतोष माळी आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी विलास पारकर यांनी बंडखोरांवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, पक्षाने सर्व आमदारांच्या एकमतानेच राष्ट्रवादी व कॉंग्रेससोबत महाविकास आघाडी सरकारचा निर्णय घेतला होता. तरीही आता बंडखोरी झाली. मात्र, असे प्रसंग शिवसेनेसाठी नवीन नाहीत. कारण शिवसेना हा पक्ष निष्ठावान शिवसैनिकांवर चालतो. आता पक्षातून मरगळ, घाण गेल्याने नवीन शिवसैनिकांना संधी आहे. लवकरच कार्यकारिणी तयार करा. नव्याने सुरुवात करुन तीन महिन्यांत पक्षबांधणी करा.आता पक्षात जो काम करेल, शाखा उभारेल, जनतेची सेवा करेल त्याचा पदांवर संधी मिळेल. पक्षाने यापूर्वी अनेक बंडाळ्या पाहिल्या. यामुळे पक्षासोबत गद्दारी करुन गेलेले भविष्यात निवडून येणार नाहीत, असा दावा देखील त्यांनी केला.