भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | नकली सोने हे खरे असल्याचे भासवून विक्री करणार्या राजस्थानातील दोन भामट्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
भुसावळ तसेच परिसरात नकली सोने विकणारी टोळी फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची खातरजमा करून डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी पोलीस पथकाला कारवाईचे आदेश दिले. यानुसार पोलीस पथकाने शिरपूर-कन्हाळा रोडवरील वर्ल्ड स्कूलजवळून दोघांना ताब्यात घेतले. त्यांचे नाव आरोपी किसनलाल दौलतराम बागरी व बाबूलाल ओबाराम बागरी हे असून दोन्ही जण राजस्थानातील असल्याची माहिती मिळाली.
दरम्यान, पोलिसांनी केलेली चौकशीत हे दोन्ही जण त्यांच्याकडे असणारे नकली सोने हे खरे असल्याची बतावणी करून विकत असल्याची त्यांनी कबुली दिली. आपल्याला खोदकाम करतांना सोने मिळाले असून ते कमी किंमतीत विकत असल्याचे आमीष ते दाखवत होते. ही माहिती मिळाल्यानंतर किसनलाल दौलतराम बागरी (वय ३६ रा. बल्लुर ता. जि. सिरोही राजस्थान ) आणि बाबूलाल ओबाराम बागरी (वय ४२ रा. लक्ष्मीनगर, बिबल्सर ता. जि. जालोद राजस्थान) या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आज त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही कारवाई डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे आणि पोलीस निरिक्षक विलास शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सूरज पाटील, रमण सुरळकर, गणेश राठोड, यासीन पिंजारी यांच्या पथकाने केली.