भुसावळ प्रतिनिधी | खासगी हॉस्पीटलच्या आयसीयूमध्ये भरती असलेल्या रूग्णाने आज सकाळी दुसर्या मजल्यावरून उडी घेतली असून यात त्याला दुखापत झाल्याचे वृत्त आहे.
याबाबत वृत्त असे की, शहरातील रिदम हॉस्पीटलमधील आयसीयूमध्ये दोन दिवसांपासून तळवेल येथील रूग्णावर उपचार सुरू होते. या रूग्णाने आज सकाळी सहा वाजेच्या सुमारास मागील बाजूच्या खिडकीचे काच तोडून खाली उडी घेतली. दोन मजल्यावरून खाली उडी घेतल्याने या रूग्णाला दुखापत झाली.
दरम्यान, रूग्णालयातून उडी मारल्यानंतर हा रूग्ण थेट रस्त्यावर पळत सुटला. मात्र त्या रूग्णाच्या आप्तांनी पाठलाग करून त्याला पुन्हा समजावून रिदम हॉस्पीटलमध्ये भरती केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या रूग्णाने नेमकी कशासाठी उडी घेतली. याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
या रूग्णाचे नाव मिलींद जगन्नाथ पाटील (वय ४५) हे असून विषबाधा झाल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज सकाळी साडेसहाच्या सुमारास त्यांनी उडी मारल्याची घटना घडली असून या संदर्भात बाजारपेठ पोलिसांनी चौकशी केली आहे. रूग्णावर सध्या उपचार सुरू असल्याची माहिती ही रिदम हॉस्पीटल प्रशासनाच्या वतीने डॉ. नितीन पाटील यांनी दिली आहे.