भुसावळ प्रतिनिधी | शहरातील शिवपूर-कन्हाळा रोडवरील एका फर्निचर गोडाऊनवर टाकलेल्या धाडीत अवैध देशी दारूचा मोठा साठा जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे व श्रीरामपूर येथील पथकाने ही कारवाई केल्याचे वृत्त आहे.
भुसावळ शहरात अवैध देशी दारू मोठ्या प्रमाणात विकली जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. या अनुषंगाने आज सायंकाळी पुणे आणि श्रीरामपूर येथील पथकाने शिवपूर-कन्हाळा रोडवरील गणेश कोटींग अँड फर्निचर या गोडाऊनवर छापा मारला. बाहेरून हे गोदाम फर्निचर दुकानाचे असल्याचे दिसून येत असले तरी याच्या मागील बाजूला देशी दारूचा खूप मोठा साठा करण्यात आला असल्याचे या पथकाला आढळून आले. हा साठा जप्त करण्यात आला असून याबाबतचा पंचनामा सुरू करण्यात आला आहे.
या ठिकाणी पथकाने पाहणी केली असता येथे बनावट देशी दारू तयार केली जात असल्याचे दिसून आले. येथे बनावट दारूसाठी लागणारे रसायन, बॅरल्स आदी सामग्री आढळून आली. तर तयार केलेल्या देशी दारूचे साधारणपणे साडे तीनशे बॉक्स जप्त करण्यात आले.
संबंधीत फर्निचरचे गोदाम हे राजकीय नेत्यांशी लागेबांधे असणार्या तरूणाचे असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र शेवटचे वृत्त हाती आले तोवर त्याला अटक करण्यात आली नव्हती. भुसावळात इतक्या मोठ्या प्रमाणात अवैध देशीचा साठा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. हा साठा नेमका किती रूपयांचा आहे ? याबाबतची अचूक माहिती अद्याप समोर आली नसली तरी किमान दहा लाख रूपयांपेक्षा याचे मूल्य असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.