भुसावळ प्रतिनिधी । येथील नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी अर्वाच्च भाषेत धमकावल्याबाबत शिवसेनेने आज जिल्हाधिकार्यांना निवेदन देऊन संबंधीतांवर कारवाई करण्याची मागणी केली.
याबाबत वृत्त असे की, शिवसेनेच्या पदाधिकारी पूनम प्रवीण बर्हाटे यांनी जिल्हाधिकार्यांची दुपारी भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यात म्हटले आहे की, आज शिवसेनेचे पदाधिकारी नगरपालिका येथे मुख्याधिकार्यांना भेटण्यासाठी गेले होते. त्यांच्यासोबत बैठक सुरू असतांना त्या ठिकाणी विद्यमान नगराध्यक्ष व त्यांचे नगरसेवक अचानक येवून अर्वाच्च व अरेरावीची भाषा केली. ते धक्काबुक्की करुन म्हणाले की, तुम्ही विकासात्मक बाबींची विचारणा करणारे कोण आहे? तुम्ही हे विचारु शकत नाही व आम्हाला सीईओ साहेबांच्या दालनातुन बाहेर काढले. यावर महिला आघाडीच्या अध्यक्षा म्हणाल्या की आम्ही सार्वजनिक व सामान्य व्यक्ती असुन तुम्ही लोक सेवक आहेत. आम्हाला माहिती देणे हे तुमचे आद्य कर्तव्य आहे. भुसावळच्या जनतेला शहरातील सर्व विकास कामांची माहिती तुम्ही देत नाही. शहरातील कुठलाही विकास न होता सर्व टेंडर, बीले पास करुन घेतलेली आहे. या सर्व भ्रष्टाचारी व अनागोंदी कारभाराची चौकशी व्हावी व या लोकशाहीला न्याय मिळावा अशी अपेक्षा या निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांना हे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी पूनम बर्हाटे यांच्यासह पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.