भुसावळ प्रतिनिधी | पोलीस प्रशासनाने गुन्हेगार आणि गुन्हेगारी टोळ्यांना हद्दपार करण्याचे सत्र सुरू ठेवत आता तालुक्यातील वराडसीम येथील सचिन संतोष सपकाळे याला दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.
भुसावळातील गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी हद्दपारीचे अनेक प्रस्ताव तयार केले असून आता याला मंजुरी मिळत असल्याचे दिसून येत आहे. पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी गेल्या आठवड्यात खरात टोळीला हद्दपार केले. यानंतर दि.१७ ऑगस्ट रोजी राजू सूर्यवंशी यांच्यासह ८ जणांना दोन वर्षांसाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. या पाठोपाठ तालुक्यातील सचिन सपकाळेला दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे.
वराडसीम येथील सचिन सपकाळे याच्या हद्दपारीचा प्रस्ताव ४ जानेवारी २०२१ रोजी प्रांत कार्यालयात दाखल करण्यात आला होता. प्रांत सुलाणे यांनी पोलिस प्रशासनासह सचिन सपकाळे याचे म्हणणे ऐकून घेतले. यानंतर सचिनला दोन वर्षांसाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. दरम्यान, प्रांताचे आदेश भुसावळ तालुका पोलिसांकडे देण्यात आले असून ते सपकाळेला तातडीने हे आदेश बजावणार आहेत. यानंतर त्याला दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात येणार आहे.
दरम्यान,शहरातील सुमारे १०० उपद्रवी व गुन्हेगारांना हद्दपार करण्यासाठी त्यांची कुंडली जमा करण्यात आली असून या पैकी पहिल्या टप्प्यात ५५ जणांच्या हद्दपारीचे प्रस्ताव तयार करून वरिष्ठांकडे पाठवण्यात आले आहे. पुन्हा ४५ प्रस्ताव पाठवले जाणार आहेत. यामुळे गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ उडाली आहे.