भुसावळातील एक गुंड सहा महिन्यांसाठी हद्दपार

भुसावळ- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील मोहंमद हासीम मोहंमद सलीम शेख या गुन्हेगाराला प्रांताधिकार्‍यांनी सहा महिन्यांसाठी हद्दपार केले आहे.

शहरातील गुन्हेगाराची निर्दालन करण्यासाठी पोलीस प्रशासनाने विविध गुन्हेगार आणि टोळ्यांना हद्दपार करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहे. आधीच खरात टोळीला हद्दपार करण्यात आले असून आता अजून काही गुन्हेगारांच्या कुंडल्या तयार करण्यात आल्या आहेत. या अनुषंगाने शहरातील एका गुन्हेगाराला सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले आहे.

मोहंमद हासीम मोहंमद सलीम शेख (रा. प्रल्हादनगर, भुसावळ ) याच्या विरुध्द अनेक गुन्ह्यांची नोंद असल्यामुळे पोलिसांनी प्रांताधिकार्‍यांकडे हद्दपारीचा प्रस्ताव दाखल केला होता. यावर प्रांताधिकारी रामसिंग सुलाने यांनी शेख याला सहा महिन्यासाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश काढले आहेत. बाजारपेठ पोलिसांकडून हे आदेश बजावण्याची प्रक्रीया सुरू करण्यात आली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी शहरातील अनेक गुंडांचे हद्दपारीचे प्रस्ताव तयार असल्याची माहिती दिली होती. यामुळे आता येत्या काही दिवसांमध्ये अजून काही गुन्हेगारांची हद्दपारी होण्याची शक्यता आहे.

Protected Content