भुसावळ प्रतिनिधी । जळगाव जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था तथा डायटच्या प्राचार्यपदी नंदूरबार येथून बदली होऊन आलेले प्रा. अनिल झोपे यांचा भुसावळ येथील ‘ज्ञानासह मनोरंजन गृप’तर्फे स्वागत सन्मान करण्यात आला.
जळगाव जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था तथा डायटच्या प्राचार्यपदी नंदूरबार येथून बदली होऊन आलेले प्रा. अनिल झोपे यांचा भुसावळ येथील ज्ञानासह मनोरंजन गृपतर्फे स्वागत सन्मान करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नाशिक डायटचे अधिव्याख्याता डॉ. चंद्रकांत साळुंखे उपस्थित होते. प्रारंभी ज्ञानासह मनोरंजन गृपप्रमुख डॉ. जगदीश पाटील यांनी प्रा. अनिल झोपे यांचा परिचय करून दिला. त्यानंतर प्रा. झोपे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व श्री संत आदिशक्ती मुक्ताई गाथा भेट देऊन स्वागत सन्मान करण्यात आला.
यावेळी ज्येष्ठ शिक्षक नाना पाटील, प्रा. श्रीकांत जोशी, डी. के. पाटील, संजय ताडेकर, श्यामकांत रूले, अमितकुमार पाटील, वसंत सोनवणे व डॉ. जगदीश पाटील आदींनी प्रा. झोपे यांचा सत्कार केला. नाशिक डायटचे अधिव्याख्याता डॉ. चंद्रकांत साळुंखे म्हणाले की, अध्ययन निष्पत्तीनिहाय कृतींची मालिका तयार करणे सहज शक्य आहे. त्यामुळे कठीण घटकांवर आधारित शैक्षणिक साहित्याची निर्मिती केली जावी. विविध नाविन्यपूर्ण उपक्रम तयार केले जावे. जेणेकरून विद्यार्थ्यांना त्याचा लाभ घेता येईल. अशा विविध भूमिका शिक्षकांना निभवाव्या लागणार आहे.
सत्कारार्थी मनोगत व्यक्त करताना डायट प्राचार्य अनिल झोपे म्हणाले की, ऑनलाईन व ऑफलाईन अशी संमिश्र शिक्षणपद्धती कशा पद्धतीने राबवता येईल यासाठी शिक्षक, शाळा, पालक व विद्यार्थी यांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रत्येक शिक्षकाने ऑनलाईन साक्षरता ग्रहण करण्याची गरज आहे. त्याकरिता नवनवीन तंत्रज्ञानाची ओळख करून घेणे गरजेचे झाले आहे. शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही प्रा. झोपे यांनी यावेळी केले. सूत्रसंचालन श्यामकांत रूले यांनी तर आभार वसंत सोनवणे यांनी मानले.