भुसावळ, संतोष शेलोडे । माझ्या आमदार निधीतून तालुक्यातील विविध गावांमध्ये तीन कोटी ८६ लाख रूपयांची कामे आधीच करण्यात आलेली आहेत. यातील काहींची देयके बाकी असली तरी ती निरंतर चालणारी प्रक्रिया असून यात आमदारांची कोणत्याही प्रकारची भूमिका नसते. यामुळे आमदारांनी निधी खर्च करण्यात हात आखडता केल्याचा दावा खोटा असून उलटपक्षी आम्हाला निधीची कमतरता असल्याचे प्रतिपादन आमदार संजय सावकारे यांनी केले.
अलीकडेच एका वृत्तपत्रात जिल्ह्यातील आमदारांचा निधीत हात आखडता अशा आशयाचे वृत्त प्रकाशित झाले होते. यात भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी कमी प्रमाणात आमदार निधीचा विनीयोग केल्याचा दावा करण्यात आला होता. या संदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलतांना आमदार सावकारे यांनी ही बाब साफ चुकीचे असल्याचे सांगितले.
आमदार संजय सावकारे म्हणाले की, वास्तविक पाहता आमदार निधीतील कामांचे आधीच नियोजन करण्यात आले असून यातून तालुक्यात तीन कोटी ८६ लाख रूपयांची कामे करण्यात आली आहेत. कंत्राटदारांची बिले न मिळाल्याचा अर्थ निधीसाठी हात आखडता असा होत नाही. बिले मिळणे ही निरंतर चालणारी प्रक्रिया असून यात आमचा काहीही हस्तक्षेप नसतो. याच्या उलट आम्हाला नेहमीच आमदार निधी कमी पडत असतो असे प्रतिपादन आमदार संजय सावकारे यांनी याप्रसंगी केले.
खालील व्हिडीओत पहा आमदार संजय सावकारे नेमके काय म्हणालेत ते ?