भुसावळ प्रतिनिधी । आगामी नगरपालिका निवडणुकीआधी शहरातील उपद्रवींच्या हद्दपारीचे प्रस्ताव तयार करण्यात आल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे.
येत्या काही महिन्यांमध्ये नगरपालिका निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमिवर, डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी शहरातील शहर, बाजारपेठ आणि तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शंभर उपद्रवींविरुद्ध हद्दपारीचे प्रस्ताव तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यात ज्यांच्याविरुद्ध अशांतता निर्माण करणे, शासकीय कामात अडथळा आणणे, दादागिरी करणे, खून, जीवघेणा हल्ला अशा विविध कलमांन्वये गुन्हे दाखल आहेत, अशांची यादा तयार करण्यात येत असून आतापर्यंत ५१ जणांच्या हद्दपारीचे प्रस्ताव तयार झाले आहेत. यापैकी २५ प्रस्ताव वरिष्ठांकडे रवाना देखील झाले आहेत. अन्य प्रस्ताव येत्या आठवडाभरात सादर होतील. यात गुन्हेगारांसह काही राजकीय मंडळींचा समावेश आहे.
डीवायएसपी वाघचौरे यांनी पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, निरीक्षक दिलीप भागवत, निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांची बैठक घेतली. त्यांना त्यांच्या पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असलेल्या उपद्रवींची माहिती काढण्यास सांगितले होते. त्यानुसार अजून ४९ प्रस्ताव तयार केले जाणार आहेत. यामुळे येत्या काही दिवसांमध्ये हद्दपारीची कारवाई होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.