सर्वोदय छात्रालयास ठोकले कुलूप; प्रमोद सावकारेंचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

भुसावळ प्रतिनिधी । येथील सर्वोदय छात्रालय या मागासवर्गियांसाठी असणार्‍या संस्थेच्या इमारतीच्या वादाच्या पार्श्‍वभूमिवर आज छात्रालयाचे अध्यक्ष प्रमोद सावकारे यांनी या वास्तूला कुलूप ठोकले आहे. तर त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊन ही वास्तू आणि याची जागा हडप करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत कारवाईची मागणी केली आहे.

याबाबत वृत्त असे की, शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणार्‍या सर्वोदय छात्रालय या संस्थेच्या इमारतीत सुरू असणार्‍या बांधकामाचा वाद आता चिघळला आहे. काही दिवसांपूर्वी येथील बांधकाम थांबविण्यासाठी मुख्याधिकारी संदीप चिद्रवार हे आपल्या सहकार्‍यांसह गेले असता माजी आमदार संतोष चौधरी यांनी त्यांना शिवीगाळ करून धमकावल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणी संदीप चिद्रवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संतोष चौधरी यांच्या विरूध्द शासकीय कामात अडथळा आणण्याच्या कलमाखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यात चौधरी यांना सध्या अंतरीम जामीन मिळालेला आहे.

दरम्यान, सर्वोदय छात्रालयचे अध्यक्ष प्रमोद सावकारे यांनी आधीच या प्रकरणात संतोष चौधरी हे दबावतंत्राचा वापर करत असल्याचा आरोप केला आहे. यानंतर सावकारे यांनी जिल्हाधिकार्‍यांना पत्र लिहून सर्वोदय छात्रालय ही संस्था, याची वास्तू आणि जमीन हडप करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला आहे. एका महिला डॉक्टरने खोटी कागदपत्रे देऊन सर्वोदय छात्रालय आपल्या कब्जात करण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या संदर्भात काही राजकीय पुढारी, नगरपालिकेतील काही कर्मचारी यांना हाताशी धरून हा कट रचण्यात आल्याच आरोप त्यांनी केला आहे. याबाबत तातडीने कार्यवाही करण्याची मागणी देखील प्रमोद सावकारे यांनी केली आहे.

यानंतर प्रमोद सावकारे यांनी आज सर्वोदय छात्रालयाच्या गेटला कुलूप लाऊन घेतले. यासंदर्भात लाईव्ह ट्रेंडस न्यूजने संपर्क साधला असता ते म्हणाले की, काही अपप्रवृत्ती या संस्थेचा ताबा घेण्याचा प्रयत्न करत असल्याने आपण याला कुलूप लावले आहे. प्रशासनाने या प्रकरणी तात्काळ कारवाई करण्याची मागणी देखील प्रमोद सावकारे यांनी केली आहे.

Protected Content