भुसावळ प्रतिनिधी । येथील नगरपालिकेने ३४ कोटी ५९ लाख रूपये शिलकीचा अर्थसंकल्प जाहीर केला असून यात कोणत्याही प्रकारची करवाढ सुचविण्यात आलेली नाही.
याबाबत वृत्त असे की, भुसावळ नगरपालिकेने शुक्रवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे अर्थसंकल्पीय सभा घेतली. नगराध्यक्ष रमण भोळे, मुख्याधिकारी संदीप चिद्रवार, उपमुख्याधिकारी महेंद्र कतोरे, लेखाधिकारी विनोद चावरिया आदी उपस्थित होते. या विशेष सभेत पालिकेने सन २०२१-२२ साठी २१४ कोटी ५९ लाख रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले. २४ कोटी ५९ लाख रुपये शिलकीचा हा अर्थसंकल्प या सभेत सादर करण्यात आला.
या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ केलेली नाही. तर, नगरपालिकेला राज्य शासनाचा १५ वा वित्त आयोग, अमृत योजना, वैशिष्टपूर्ण कामे, दलितवस्ती सुधार योजना, विशेष रस्ता निधी, दलितेतर वस्ती सुधार योजना, नगरोत्थान प्रकल्प, नागरी दलितेतर वस्ती सुधार योजना, स्वच्छ महाराष्ट्र अभियान, पंतप्रधान आवास योजना, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन अभियान आदींसह राज्य व केंद्र शासनाकडून मिळणार्या विविध योजनांमधून पालिकेला अनुदान व निधी उपलब्ध होणार आहे.
अर्थसंकल्पात संत गाडगेबाबा रुग्णालय व त्याअंतर्गत येणार्या सर्व उपकेंद्रांसाठी वार्षिक ४० लाख रुपयांच्या औषध खरेदीची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. यासोबतच शहरात स्वच्छता, औषध फवारणीसाठी ५ लाखांनी तरतूद वाढवून ती २५ वरुन ३० लाख रुपये करण्यात आली आहे. यासोबत गटारींची निर्मिती, घनकचरा व्यवस्थापन, कचरा वर्गीकरण यासारख्या बाबींवरही वाढीव निधीची तरतूद करण्यात आली आहे.