भुसावळ प्रतिनिधी । माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यावर बेताल आरोप करणारे प्रफुल्ल लोढा यांच्या प्रतिमेला भुसावळात जोडा मार आंदोलन करून त्यांचा निषेध करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी जोरदार घोषणाबाजी करत खडसेंना पाठींबा दर्शवत लोढांचा धिक्कार केला.
शहरातील अष्टभुजा देवीच्या मंदिराजवळ आज राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांनी प्रफुल्ल लोढा यांच्या प्रतिमेला जोडा मार आंदोलन केले. याप्रसंगी पोलीस प्रशासनाने लोढा यांची प्रतिमा आणि त्यांचा प्रतिकात्मक पुतळा जप्त करून नेला. याप्रसंगी उपस्थितांनी एकनाथराव खडसे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करून लोढा यांच्या आरोपांबद्दल निषेध व्यक्त केला.
दरम्यान, याप्रसंगी माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे म्हणाले की, प्रफुल्ल लोढा यांनी अतिशय विकृत पध्दतीत व खालच्या पातळीवरून केलेले आरोप हे निषेधार्ह असे असून लोकनेते एकनाथराव खडसे यांची प्रतिमा मलीन करणारे आहेत. लोढा यांचा राष्ट्रवादीशी काहीही संबंध नाही. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर ते राष्ट्रवादीत आले आहेत. त्यांनी कितीही आरोप केले आणि भाजप सरकारने ईडीची चौकशी लावली तरी नाथाभाऊ हे यातून सुखरूपपणे बाहेर येतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन चौधरी यांनी या प्रकाराचा निषेध करत राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्याबाबत असला प्रकार खपवून घेतला जाणार नसल्याचे बजावले.
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, जिल्हा परिषदेचे गटनेते रवींद्र नाना पाटील, बाजार समिती सभापती सचिन चौधरी, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन धांडे, पालिकेतील गटनेते उल्हास पगारे, नगरसेवक दुर्गेश ठाकूर, तम्मा पहेलवान, वरणगावचे शहराध्यक्ष संतोष माळी, विनोद चावरिया, ललीत मराठे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
खाली पहा याचा व्हिडीओ वृत्तांत.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1864907527010415