पालिका रुग्णालयातील अपुर्‍या मनुष्यबळाबाबत आ. संजय सावकारे यांचा तारांकित प्रश्‍न

भुसावळ प्रतिनिधी । येथील पालिकेच्या संत गाडगेबाबा रुग्णालयातील अपूर्ण कर्मचार्‍यांच्या संदर्भात आमदार संजय सावकारे यांनी आगामी हिवाळी अधिवेशनासाठी तारांकित प्रश्‍न मांडला आहे.

भुसावळ पालिकेच्या संत गाडगेबाबा रुग्णालयात अपूर्ण कर्मचार्‍यांमुळे रुग्णांना वेळेत उपचार मिळत नसल्याने त्यांचे हाल होत आहेत. या संदर्भात आता आमदार संजय सावकारे यांनी विधानसभेच्या आगामी हिवाळी अधिवेशनात तारांकीत प्रश्‍न उपस्थित केला आहे.

याच्या अंतर्गत संबंधीत रूग्णालयात कमी कर्मचारी संख्या आहे हे खरे असल्यास या प्रकरणी शासनाकडून आतापर्यंत काय चौकशी करण्यात आली? चौकशीच्या अनुषंगाने रुग्णालयातील रिक्त जागा भरण्याबाबत शासनाने कोणती कारवाई केली ? केली नसल्यास विलंबाची कारणे काय? असे तारांकित प्रश्‍न उपस्थित केला आहे. या संदर्भातील माहिती आता नगरविकास विभागाने मुख्याधिकार्‍यांकडून मागवण्यात आली आहे. याबाबतचे स्वयंस्पष्ट अहवाल, पूरक टिप्पणी, संबधित दस्तऐवज २३ नोव्हेंबरपर्यंत शासनाकडे ऑनलाइन पद्धतीने सादर करावे, असे निर्देशही नगरविकास विभागाने दिले आहेत.

आमदार संजय सावकारे यांनी तारांकीत प्रश्‍न उपस्थित केल्यामुळे आता तरी पालिकेच्या रूग्णालयात पुरेसे कर्मचारी उपलब्ध होऊन याचा पर्यायाने जनतेला लाभ होईल अशी आशा निर्माण झाली आहे.

Protected Content