जिल्ह्यात लॉकडाऊनमध्ये ‘या’ क्षेत्रांना मिळाली सवलत

जळगाव प्रतिनिधी । राज्य सरकारने लॉकडाऊनमध्ये नवीन व्यवसायांना शिथील करण्याचे निर्देश दिल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील याचे पालन करण्यात येत असून जिल्हाधिकार्‍यांनी याबाबतचे लेखी आदेश जारी केले आहेत.

जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी जारी केलेल्या लेखी आदेशात आता लॉकडाऊनमध्ये काही नवीन व्यवसायांना परवानगी देण्यात येणार आहे. यात प्रामुख्याने पीठ गिरण्या सुरू होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. याच्या जोडीला पॅक हाऊस, बियाणे व फलोत्पादनाच्या तपासणी व उपचार सुविधांची आयात निर्यात, शेती व बागायतीशी संबंधित संशोधन संस्था, वृक्ष लागवड व मधमाशी वसाहती, मध व त्यासंबंधीच्या उत्पादनांची राज्याअंतर्गत व आंतरराज्यीय वाहतूक, ब्रेड फॅक्टरी, दूध प्रक्रिया प्रकल्प, डाळ मिल, पंख्यांची दुकाने यांचा समावेश आहे. त्याशिवाय वन विभागाच्या कार्यालयासह वनीकरण, वृक्षारोपण व त्यासंबंधित कामांनाही लॉकडाऊनमधून वगळण्यात आले आहे. तसेच केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या मानकानुसार (एसओपी) भारतीय बंदरांमधील समुद्री जहाजांना आवक-जावक व त्यांच्या हालचालींना परवानगी देण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या काळजी घेणार्‍या अटेंडंटनाही परवानगी देण्यात आली आहे. तर सामाजिक वनीकरणाशी संबंधीत कार्यालये देखील सुरू होणार आहेत.

लॉकडाऊनमधून सूट दिली असली तरी ही कामे करताना शासनाने घोषित केलेले नियम, सामाजिक अंतर व स्वच्छता यांची काळजी संबंधित आस्थापनांनी घ्यावी, असेही या आदेशात म्हटले आहे.

Protected Content