वराडसीमच्या ऐतीहासीक पोळ्याची परंपरा कायम: यंदा उदंड उत्साह

Bhuswal भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील वराडसीम येथे परंपरेनुसार पोळा साजरा करण्यात आला. यात गाव दरवाजाच्या लहानशा खिडकीतून बैलाची उडी पाहण्यासाठी परिसरातील आबालवृध्दांनी तोबा गर्दी केली होती.

 

वराडसीम येथील पोळा सणाला सुमारे साडेचारशे वर्षांची परंपरा आहे. यात अन्य गावांप्रमाणे बैलांचे पूजन तर करण्यात येतच, पण यासोबत गाव दरवाजाला असणार्‍या अडीच बाय तीन फुट इतक्या लहान आकाराच्या खिडकीतून बैलास उडी मारण्यासाठी प्रवृत्त करण्यात येते. यातून जोर बैल उडी मारतो त्याच्या मालकाला सन्मानीत करण्यात येते. कोविडच्या आपत्तीमुळे गेल्या दोन वर्षांपासून हा सण पूर्णपणे उत्साहात साजरा करण्यात आला नव्हता. यंदा मात्र कोणतेही निर्बंध नसल्यामुळे आबालवृध्दांचा उत्साह ओसंडून वाहत असल्याचे दिसून आले.

 

गाव दरवाज्याच्या अडीच बाय तीन फूट खिडकीतून निघणार्‍या प्रथम बैलजोडीचा व बैलजोडीच्या मालकाचा वराडसीम ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाच्या वतीने सत्कार करण्यात आला. हा उत्सव पाहण्यासाठी हजारो आबालवृध्दांनी गर्दी केली होती. तर अनुचीत प्रकार होऊ नये म्हणून चोख बंदोबस्त राखण्यात आला होता.

Protected Content