जीवन उत्तम प्रकारे जगा – गंगाधर बनबरे

अमळनेर, प्रतिनिधी | संत तुकारामांच्या सुविचारातून शिवरायांनी स्वराज्य निर्माण केले. महापुरुषांनी सांगितल्याप्रमाणे जन्माआधी जन्मानंतर काहीही नसते म्हणून आहे त्या जीवन उत्तमप्रकारे जगा असे प्रतिपादन पुणे येथील सुप्रसिद्ध लेखक व विचारवंत गंगाधर बनबरे यांनी केले. अमळनेर येथे राष्ट्रविचार प्रबोधन कार्यक्रमांतर्गत शांताराम पाटील स्मृती व्याख्यानमालेत बोलत केले.

 

गंगाधर बनबरे यांनी पुढे सांगितले की, संपूर्ण जगात स्वातंत्र्य समता व बंधुता या तत्त्वांवर आधारित लोकशाही ही माणूस केंद्रस्थानी ठेवून निर्माण झालेली आहे म्हणून आपल्या प्रत्येक विचाराच्या केंद्रस्थानी कुठलीही अमूर्त संकल्पना न ठेवता माणूस ठेवून विचार केला तरच विचारात आणि समाजात परिवर्तन शक्य आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटन क्रांतिसूर्य महात्मा फुले ,विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि स्मृतिशेष शांताराम पाटील यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून झाले. यावेळी मंचावर प्रमुख वक्ते गंगाधर बनबरे, प्रा. शिवाजीराव पाटील, प्रा. अशोक पवार, बन्सीलाल भागवत, प्रा. लिलाधर पाटील, रणजित शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शिवाजीराव पाटील यांनी ‘बुद्ध फुले शाहू आंबेडकर यांचा विचार हा मानव केंद्रित विचार असून तत्त्वज्ञान आणि प्रत्यक्ष व्यवहार यांची सांगड घालण्यात समृद्धपणे कसे जगता येईल. कालानुरूप आपल्या विचारात बदल करून अधिकाधिक तार्किक आणि विज्ञानवादी होत जाणे यातूनच समाज उन्नत होईल. स्वतःच्या प्रगतीसाठी प्रचंड कष्ट करा व समाजाशी असलेली नाळ कधीही तोडू नका! असा सल्ला उपस्थितांना दिला.
स्मृतिशेष शांताराम पाटील यांच्यासारख्या सर्व सामान्य कार्यकर्त्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित व्याख्यान कार्यक्रमातून हजारो कार्यकर्त्यांना बळ मिळेल असा विश्‍वास या प्रसंगी व्यक्त करून सांगितले की महापुरुषांच्या विचारांचा हा जागर १९ फेब्रुवारीपासून सुरु झालेला असून येत्या कालखंडात अमळनेर शहराच्या विविध भागांमध्ये महापुरुषांच्या जयंती व स्मृतिदिनानिमित्त यासारखे कार्यक्रम आयोजित केले जातील असे प्रा अशोक पवार यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले.
याप्रसंगी शिक्षण महर्षी पंजाबराव देशमुख परिषदेतर्फे महात्मा फुले जीवन गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रा. लीलाधर पाटील यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन रणजित शिंदे यांनी तर आभार बन्सीलाल भागवत यांनी मानले. याप्रसंगी जळगाव येथील मराठा सेवा संघाचे कार्याध्यक्ष राम पवार, पाडळसरे धरण समितीचे सुभाष चौधरी, नागरी कृती समितीचे संदिप घोरपडे, शिक्षण विस्तार अधिकारी अशोक बिऱ्हाडे, प्रा. सुभाष पाटील, मराठा सेवा संघाचे कैलास पाटिल, नगरसेवक श्याम पाटील, अशोक पाटील, प्रा. राहुल निकम, पीडिएसपीचे विलास पाटील, अरुण देशमुख, पू. सानेगुरुजी ग्रंथालयाचे दिलीप सोनवणे, भाऊसाहेब देशमुख, छाया सौनवणे, वाल्मिक पाटील, भास्कर बोरसे, सेवा निवृत्त एस. डी. देशमुख आदिंसह मान्यवर उपस्थित होते.

Protected Content