भुसावळ प्रतिनिधी | कोरोनामुळे आपण सुरक्षित रहा…अन् आपल्या कुटुंबाचीही काळजी घ्या असे आवाहन करून आपण आहात तेथूनच नवदाम्पत्याला आशीर्वाद द्या असे आवाहन करणारी विवाह पत्रीका सध्या चर्चेचा विषय बनली आहे. जामनेर येथील माजी नगरसेवक रमाकांत हरी पाटील यांची कन्या चि.सौ. कां. सायली व कुऱ्हे पानाचे येथील प्रभाकर तुकाराम पाटील ( हल्ली मुक्काम जामनेर , मुख्याध्यापक ) यांचे पुत्र व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे स्वीय सहाय्यक तथा जिल्हा परिषदेचे माजी गटनेते विश्वनाथ पाटील यांचे पुतणे चि. स्वप्निल यांचा विवाह सोहळा दिनांक 28 रोजी जामनेर येथे पार पडत असून या विवाहाच्या पत्रिकेत हे जगावेगळं करण्यात आले. या विवाहाच्या पत्रीकेत कोरोनाच्या आपत्तीतील नियमांचे पालन करत समाजाचे प्रबोधन करण्यात आलेले आहे. यामुळे समाजातून याबाबत कौतुक केले जात आहे.
जय्यत तयारी
विवाह हा आयुष्यातील सर्वात महत्वाचा मंगल सोहळा असल्याने तो आपापल्या परीने भव्य दिव्य साजरा करण्याचे प्रयत्न सर्वच जण करत असतात. गत मार्च महिन्यापासून कोविडच्या संसर्गामुळे विवाह सोहळ्यांना आटोपशीर पध्दतीत साजरे केले जात आहे. मध्यंतरी संसर्ग कमी झाल्यामुळे विवाह मोठ्या धुमधडाक्यात साजरे होऊ लागले होते. या अनुषंगाने जामनेरातील माजी नगरसेवक रमाकांत हरी पाटील यांची कन्या चि.सौ.कां. सायली व कुऱ्हे पानाचे येथील माजी जिल्हा परिषद सदस्य विश्वनाथ पाटील यांचे पुतणे तथा जामनेरातील मुख्याध्यापक प्रभाकर तुकाराम पाटील (पी. टी. पाटील सर) यांचे चिरंजीव स्वप्नील यांचा विवाह नियोजीत करण्यात आल्याने याची जय्यत तयारी सुरू करण्यात आली होती. यासाठी नातेवाईकांसह स्नेह्यांना तसेच राजकिय , सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांना आमंत्रीत करण्यात आले होते.
प्रशासनाच्या नियमांचे पालन
तथापि, ही सर्व लगीनघाई सुरू असतांना अचानक नव्याने कोरोनाचा प्रादूर्भाव वाढला. यामुळे पुन्हा एकदा विवाहादी सोहळ्यांवर नव्याने निर्बंध लादण्यात आले असून रात्रीची संचारबंदी सुध्दा जाहीर करण्यात आलेली आहे. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील व जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या निर्देशानुसार शासन आणि प्रशासन कोविडच्या प्रतिकारासाठी परिश्रम घेत असल्याचे पाहून वर व वधू या दोन्ही कुटुंबांनी आपल्याकडचा विवाह साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी नव्याने तयार करण्यात आलेली पत्रीका ही सोशल मीडियात व्हायरल झालेली असून ती अनेकांच्या चर्चेचा विषय बनली आहे.
काय आहे पत्रिकेत ?
या पत्रिकेत नमूद केले आहे की, चिरंजीव स्वप्नील आणि चि.सौ.कां. सायली यांचा विवाह रविवार दिनांक २८ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजून ७ मिनिटांनी होत आहे. या महन्मंगल प्रसंगी आमच्या कुटुंबियांचे आप्त स्नेही म्हणून आपण सादर सस्नेह आमंत्रित आहात !
हा विवाह अतिशय चैतन्यदायी वातावरणात साजरा करण्याचा मानस आम्ही केला होता. या अनुषंगाने जय्यत तयारी देखील करण्यात आली होती. तथापि, अलीकडच्या काळातील कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, प्रशासनाने दिलेल्या निर्देशानुसार हा सोहळा अतिशय साधेपणाने पार पाडण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. यामुळे कृपया आपण आहात तेथूनच उभयतांना आशीर्वाद द्यावा आपण सुरक्षित रहावे आणि स्वतःची काळजी घ्यावी व जबाबदार नागरिकांचे कर्तव्य आम्ही पार पाडणार…!आपणही सहकार्य करावे असे कळकळीचे आवाहन दोन्ही पाटील परिवारातर्फे करण्यात आले आहे.
कोविडविषयी जनजागृती
या विवाह पत्रीकेवर कोविडच्या प्रतिकारासाठीची जनजागृती अतिशय समर्पक प्रकारे करण्यात आलेली आहे. यात प्रशासनाने आखून दिलेल्या सर्व नियमांची माहिती देण्यात आली असून नागरिकांनी याचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर कोविडच्या संसर्गामुळे आपल्याला आमंत्रीत करण्यात आले असले तरी कुणी विवाहाला न येता जिथे असाल तेथूनच आशीर्वाद व शुभेच्छा देण्याचे आवाहन मुलीकडून रमाकांत पाटील, प्रकाश पाटील, विजय पाटील तर मुलाकडून प्रभाकर पाटील, भास्कर पाटील व विश्वनाथ पाटील यांनी केले आहे.आहे.