भुसावळ प्रतिनिधी । शहरात जिथे अमृत योजनेचे काम पूर्ण झाले आहे अशा कॉलन्यांमधील रस्त्यांची दुरूस्ती करण्याची मागणी माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनी केली आहे.
माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनी एक निवेदन जारी केले आहे. यात म्हटले आहे की, अमृत योजनेच्या कामामुळे पाइपलाइन टाकण्याचे कामी खोदकामाच्या कामांमुळे रस्त्यांची खूपच दयनीय अवस्था झालेली आहे, अमृत योजनेच्या पाइपलाइनच्या खड्ड्यांमुळे मागील काळात मुरूम टाकला असता तो तंत्रशुद्ध फैलाव न करता ओबडधोबड पद्धतीने टाकला. त्यामुळे नागरिकांना पायी चालले सुद्धा जिकिरीचे झाले आहे. या भागातील ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांसह सर्वच नागरिक खूप त्रस्त झाले आहेत. खराब रस्त्यांवरील नादुरुस्त रस्त्याने जाणार्या नागरिकांना कमरेचा त्रास, पाठ दुखी, हाडांचे त्रास यांत वाढ झाल्याने निवेदनात नमूद केले आहे.
यात पुढे नमूद केले आहे की, शहरातील सुरभी नगर, साधना नगर, देना नगर, कस्तुरी नगर, मुक्तानंद कॉलनी, नेब कॉलनी, रघुकुल कॉलनी, सुहास नगर, गोविंद कॉलनी, गणपती मार्बल, यशोधन पार्क या परिसरातील कॉलन्यांच्या अंतर्गत भागात डांबरी रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झालेली आहे. यासह शहरातील विविध भागांतील कॉलन्यांतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनी केले आहे.
दरम्यान, शहरातून दुचाकी चालवताना खड्ड्यांमुळे तिचे सर्वच स्पेअर पार्ट्स खिळखिळे होतात. त्यांच्या दुरुस्तीसाठी अतिरिक्त खर्च करावा लागत आहे. कौटुंबीक घरखर्चाचे नियोजन कोलमडले आहे. मातृभूमी चौक ते राष्ट्रीय महामागापर्यंतचा रखडलेल्या रिंग रोडवरील डांबरीकरणाच्या कामास पालिकेने गती दिली आहे. त्याच धर्तीवर आता शहरातील सुरभिनगरासह ज्या भागात अमृत पाइपलाइनचे काम पूर्ण झाले आहे अशा भागांमध्ये देखील पालिकेने रस्ता डांबरीकरणाच्या कामांना गती द्यावी, अशी मागणीही माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनी या निवेदनात केली आहे.