भुसावळ-इकबाल खान | शहरानजीक असलेल्या नवोदय विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर खळबळ उडालेली असतांना आज आमदार चंद्रकांत पाटील यांनी थेट नवोदय विद्यालय गाठून या प्रकरणाची माहिती जाणून घेतली.
या संदर्भातील वृत्त असे की, शहराच्या जवळ राष्ट्रीय महामार्गाला लागून असणार्या नवोदय विद्यालयात दहावीच्या दोन विद्यार्थ्यांना बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी काल लाईव्ह ट्रेंडस न्यूजवरून सविस्तर वृत्त प्रकाशित झाल्यानंतर याला खर्या अर्थाने वाचा फुटली. आम्ही याबाबतचा वृत्तांता प्रकाशित करतांनाच प्राचार्यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. तथापि, त्यांनी याला काहीही प्रतिसाद दिला नव्हता.
दरम्यान, लाईव्ह ट्रेंडस न्यूजवरील याबाबतचा व्हिडीओ पाहून आज मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी थेट आज नवोदय विद्यालय गाठले. त्यांनी या प्रकाराची माहिती जाणून घेतली. त्यांनी विद्यालयाचे प्राचार्य खंडारे यांच्याशी या प्रकरणाची सखोल चर्चा केली. नंतर त्यांनी प्रत्यक्षात थेट विद्यार्थ्यांशी संपर्क साधून त्यांना आश्वस्त केले. याप्रसंगी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या सोबत प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी हे देखील होते.