धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील पाळधी येथे काल रात्री भाजपचा मेळाव्याची पूर्व तयारी उधळण्याचा प्रयत्न अज्ञात लोकांना मध्यरात्री केला होता. भाजपने ही तोडफोड शिवसेनेने केल्याचा आरोप केला होता. यावर स्वत.चेच कार्यकर्ते पाठवून तोडफोड करून दुसऱ्यावर आरोप लावायचा ‘गुंडगिरीचा भुसावळ पॅटर्न’ जळगाव ग्रामीणमध्ये खपवून घेणार नाही,असा इशारा युवसेनेचे उपजिल्हा प्रमुख योगेश वाघ यांनी दिला आहे.
युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख योगेश वाघ यांनी ‘लाइव्ह ट्रेंड्स न्यूज’ला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले की, पाळधी येथे झालेला प्रकार निंदनीय आहे. परंतू कुठलाही पुरावा नसतांना थेट राज्यमंत्री गुलाबराव पाटील व शिवसैनिकांवर आरोप लावणे चुकीचे आहे. स्वत.च्याच कार्यकर्त्याकडून तोडफोड करायची आणि दुसऱ्यावर आरोप लावायची स्टाईल खूप जुनी आहे. ही स्टाईल भुसावळमध्ये चालेल. पण जळगाव ग्रामीणमध्ये चालणार नाही. विनाकारण खोटे कुंभाड रचून अंगावर येण्याचा कुणी प्रयत्न केला. तर अंगावर आलेल्याला शिंगावर घेण्याची स्टाईल शिवसेनेची आहे, हे त्यांनी विसरू नये. लोकसभेला अवघ्या १५ दिवसात शिवसैनिकांनी मेहनत घेतली म्हणून भाजपच्या उमेदवाराला जळगाव ग्रामीण मतदार संघातून एवढे मताधिक्क्य मिळाले. आमची मेहनत आणि प्रामाणिकतेचे फळ असे खोटे कुंभाड रचून दिले जाईल,याचा कधी स्वप्नातही विचार केला नव्हता.
धरणगाव तालुक्यात पर्यायी जळगाव मतदार संघात राजकारण हे एका सभ्यतेच्या मर्यादेत राहिले आहे. निवडणूक म्हटली की, आरोप प्रत्यारोपही होतात. परंतू अशा पद्धतीने गुंडगिरीचे कुंभाड आजतागायत कुणीही रचलेले नाही. पण शिवसैनिक अशा गोष्टींना घाबरत नाही. भुसावळकडे काय गुंडगिरी करायची ती, करा. पण कुणी विनाकारण आमच्या अंगावर आले. तर मात्र शिंगावर घेऊ, असा ईशाराही श्री. वाघ यांनी दिला आहे.