खरात टोळी दोन वर्षांसाठी हद्दपार ! : नगरसेवकाचाही समावेश

भुसावळ प्रतिनिधी | विविध गुन्ह्यांमधील सहभाग व दहशत निर्माण करणार्‍या भुसावळ शहरातील खरात टोळीच्या पाच सदस्यांना दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. यात नगरसेवक राजकुमार रवींद्र खरात यांचा समावेश असून यामुळे गुन्हेगारीसह राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

भाजपचे नगरसेवक रवींद्र खरात उर्फ हंप्या यांची अतिशय क्रूर पध्दतीत हत्या करण्यात आली होती. ते, त्यांचा भाऊ आणि त्यांची मुले अशा एकूण पाच जणांना एकाच वेळी संपविण्यात आल्याने देशभरात हे प्रकरण गाजले होते. यानंतर त्यांच्या प्रभागातून झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांचे पुत्र राजकुमार रवींद्र खरात यांना सर्वांनी मिळून बिनविरोध नगरसेवक म्हणून निवडून दिले होते. दरम्यान, यानंतर खरात यांच्यासह त्यांच्या सहकार्‍यांचा अनेक गुन्ह्यात सहभाग आढळून आला. त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले असून बर्‍याच जणांना धमकावण्यातही त्यांचा समावेश असल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. या अनुषंगाने पोलीस प्रशासनाने त्यांच्या हद्दपारीचा प्रस्ताव तयार केला होता. आज याला मान्यता मिळाली आहे.

याच्या अंतर्गत टोळी प्रमुख आतिष रविंद्र खरात, (वय-२५,रा.सामना नगर, भुसावळ) याच्यासह टोळीतील सदस्य राजकुमार उर्फ सनी रविंद्र खरात ( वय-२७, रा.समता नगर भुसावळ); हंसराज रविंद्र खरात, (वय-२९,रा.समता नगर );राजन उर्फ गोलू रविंद्र खरात, (वय-२२, रा.समता नगर भुसावळ) आणि अमोल उर्फ चिन्ना शाम खिल्लारे, (वय-२५,रा.देशमुखवाडी रेल्वेन्यू वॉटर टैंक, हनुमान मंदिरा जवळ अकोला ह.म, समता नगर भुसावळ या एकूण पाच सदस्यांना जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी आज जारी केले आहेत.

हद्दपारीचा प्रस्ताव अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी व डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक बाळासाहेब ठोंबे, सपोनि संदीप दुनगहू, सहायक फौजदार अनिल चौधरी, हवालदार संदीप चव्हाण, पोना विनोद तडवी यांनी तयार केला होता. याला आज मान्यता मिळाल्याने खरात टोळी दोन वर्षापासून जिल्ह्याबाहेर राहणार आहे.

Protected Content