Bhusawal भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज स्पेशल रिपोर्ट | राज्यातील सत्तांतराचे जिल्ह्यात अनेक ठिकाणी ‘साईड इफेक्ट’ होतील असे मानले जात होते. या अनुषंगाने भुसावळात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात माजी मंत्री एकनाथराव खडसे व माजी आमदार संतोष चौधरी यांच्या गटांमध्ये नगरपालिका निवडणुकीसाठी खेचताण सुरू झाल्याचे दिसून येत आहे.
लवकरच भुसावळ नगरपालिकेची निवडणूक होणार असून यात प्रत्येक पक्षाची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे Eknath Khadse यांनी राष्ट्रवादीत प्रवेश घेतल्याने पक्षाची येथे मजबूत स्थिती निर्माण झाली आहे. विशेष करून नाथाभाऊ आणि माजी आमदार संतोषभाऊ यांची जोडी ही पक्षाला येथे सत्ता स्थापन करून देणार असल्याची चर्चा सुरू होती. तथापि, राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आता पक्षातील अंतर्गत कुरबुरी प्रखरतेने समोर येतांना दिसून येत आहेत. खडसे यांनी राष्ट्रवादीत एंट्री केल्यानंतर त्यांचे अनेक समर्थकही सोबत आले आहेत. तथापि, खडसे आणि चौधरी या दोन्ही गटांनी एकमेकांपासून अंतर राखल्याचे आधीपासूनच दिसून आले आहे. यात गेल्या दोन दिवसांपासूनच्या घटनांनी आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे.
परवा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा शहरात मेळावा पार पडला. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील व संतोष चौधरी यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी खडसे समर्थकांनी या बैठकीकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. ( लाईव्ह ट्रेंडस न्यूज स्पेशल रिपोर्ट ) या बैठकीत आगामी नगरपालिका निवडणुकीत तिकिटासाठी इच्छुकांना अर्जाचे वाटप करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. यानुसार, वाटप सुरू देखील करण्यात आले. मात्र जिल्हाध्यक्षांनी काही तासांमध्येच अर्ज वाटपाला स्थगिती देण्याचे निर्देश दिल्यामुळे संतोष चौधरी संतापले. त्यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.
भुसावळ शहरात दोन दिवसात १८० इच्छुकांनी अर्ज घेऊन गेले असतांना अर्ज वाटप सुरूच राहणार असल्याचे संतोष चौधरी यांनी ठणकावले आहे. तर एकनाथराव खडसे हे मोठे नेते असून त्यांना भुसावळ पुरते लिमिटेड करू नका असा सल्लावजा इशारा देखील त्यांनी देऊन टाकला आहे. नगरपालिका निवडणुकीत बाहेर राहून काड्या करू नका असेही त्यांनी ठणकावले आहे. एकनाथराव खडसे गटातर्फे यावर संयमीत प्रतिक्रिया देण्यात आली असून निवडणुकीची सूत्रे ही कुणाकडे राहतील याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
एकनाथराव खडसे यांचे वजन आणि वलय पाहून भुसावळ नगरपालिकेतील सूत्रे त्यांच्या हाती येतील असे अनेकांचे मत आहे. तसे झाल्यास संतोष चौधरी यांचा गट नेमकी काय भूमिका घेणार ? याची सर्वांना उत्सुकता आहे. तर पक्षाने चौधरी यांना पाठबळ दिले तर खडसे समर्थकांची भूमिका देखील वेगळी राहू शकते. वरिष्ठ पातळीवरून दोन्ही गटांना जुळवून देण्याचे निर्देश देखील दिले जाऊ शकतात. मात्र, दोन्ही गटांचे खरोखरीच मनोमीलन होणार का ? हा देखील प्रश्न उरतोच.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने अद्याप स्थानिक पातळीवरील आघाडीबाबत काहीही निर्णय घेतलेला नसतांना संतोष चौधरी यांनी परवाच्या मेळाव्यात आपण शिवसेना ( अर्थातच ठाकरे गट !) आणि कॉंग्रेसलाही सोबत घेणार असल्याची परस्पर घोषणा करून टाकल्याची बाब देखील लक्षणीय आहे. अर्थात, पक्षात आधीच इच्छुकांची भली मोठी संख्या असतांना दोन्ही पक्षांना कसे सामावून घेणार ? हा देखील प्रश्न उरतोच.
एका म्यानात दोन तलवारी राहत नसल्याचे म्हटले जाते. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे म्यान हे जोवर राज्यात सत्तेवर होते, तोवर खडसे आणि चौधरी यांना एकत्र रहावे लागले. मात्र राज्यातील सत्ता बदलाने चित्र देखील बदलले आहे. नाथाभाऊंना आमदारकी मिळाल्याने पक्षाने त्यांना आधीच बळ दिलेय. तर, आता संतोष चौधरी हे देखील दोन हात करण्याच्या मूडमध्ये दिसून येत आहेत. जर राष्ट्रवादीत कुचंबणा होत असेल तर ते वेगळा मार्ग निवडू शकतात.
गेल्या नगरपालिका निवडणुकीच्या वेळी ते राष्ट्रवादीतच असतांना त्यांनी आपले चिरंजीव सचिन चौधरी यांच्यासह सहकार्यांंना जनआधार आघाडीच्या माध्यमातून रिंगणात उतारले होते. आता देखील ते असाच निर्णय घेण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. जर राष्ट्रवादीत सन्मानजनक जागा आणि निर्णय प्रक्रियेत स्थान न मिळाल्यास ते वेगळ्या आघाडीतून लढू शकतात. अन्यथा, त्यांचे बंधू अनिल चौधरी हे आधीच प्रहार जनशक्तीत दाखल झाल्यामुळे सचिन चौधरी आणि त्यांचे सहकारी हे देखील प्रहार जनशक्तीच्या माध्यमातून भुसावळात बळ आजमावण्याची शक्यता आहे. याबाबत येत्या काही दिवसांमध्ये घडामोडी घडू शकतात. तूर्तास भुसावळातील राष्ट्रवादी पक्षात वादाला फोडणी मिळाली असून याचा स्थानिक राजकारणावर मोठा परिणाम होणार असल्याचे दिसून येत आहे.