भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रेल्वेने अतिक्रमण काढलेल्या नागरिकांसाठी येथील नगरपालिकेच्या माध्यमातून तब्बल ७ हजार ६०० घरकुलांना मंजुरी मिळाली असून हा राज्यातील अशा स्वरूपाचा पहिलाच मोठा प्रकल्प असल्याची माहिती आज माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी आज प्रा. सुनील नेवे यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन घरकुलांबाबत मोठी घोषणा केली. ते म्हणाले की, रेल्वेने दोन वर्षापूर्वी अतिक्रमण काढल्यामुळे हजारो नागरिक बेघर झाले असून ते शहरात ठिकठिकाणी विखुरलेल्या अवस्थेत राहत आहेत. या नागरिकांना हक्काचे घर मिळावे यासाठी तत्कालीन नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या माध्यमातून राज्य शासनाकडे घरकुलांचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाला मान्यता मिळाली असून यातील पहिल्या टप्प्यात ३६०० तर दुसर्या टप्प्यात ४००० अशा एकूण ७ हजार ६०० घरकुलांना मान्यता मिळाली असल्याची माहिती एकनाथराव खडसे यांनी दिली.
नाथाभाऊ पुढे म्हणाले की, सद्यस्थितीत या घरकुलातील प्रत्येक घराचे मूल्य हे सुमारे साडे तेरा लाख रूपये होते. मात्र यातील पायाभूत सुविधांची जबाबदारी नगरपालिकेचे उचलली असल्यामुळे घराचे मूल्य साडे नऊ लाखांवर आलेले आहे. यातील चार लाख रूपये हे सबसिडीच्या स्वरूपात मिळणार आहेत. यात दोन लाख कामगार मंडळाकडून तर दोन लाख प्रधानमंत्री आवास योजनेतून मिळतील. परिणामी नागरिकांना हे घरकूल सुमारे साडेचार लाख रूपयांना पडणार असून यासाठी कर्ज सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
राज्यात इतक्या मोठ्या प्रमाणात घरकूल मंजूर होण्याचा हा पहिलाच प्रकल्प असून यासाठी आपल्याला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे सहकार्य लाभल्याचे खडसे म्हणाले. तसेच केंद्रीय पातळीवर खासदार रक्षाताई खडसे यांनी पाठपुरावा केल्याचेही त्यांनी नमूद केले. शहरातील पार्कच्या आरक्षणाच्या जागी हे घरकूल उभारण्यात येणार असून येथे जागा कमी पडल्यास अन्य ठिकाणी घरकूल उभारण्यात येतील अशी माहिती नाथाभाऊंनी दिली. आता पात्र लोकांना केवळ साडेपाच लाखांत घर मिळेल. हे साडेपाच लाख रुपये लाभार्थींना घर तारण ठेवून हौसिंग फायनान्सकडून दीर्घ मुदतीसाठी घेता येतील. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याला मंजुरी मिळाली. हा देशात सर्वात मोठा प्रकल्प असेल. तसेच मंत्री मंडळाची परवानगी मिळवून सर्वे क्रमांक ६३ वरील पार्कचे आरक्षण काढण्यासाठी प्रयत्न आहेत. हे आरक्षण निघाले नाही तर दुसऱ्या पर्यायी जागा देखील उपलब्ध आहेत. जागा बदलीचा प्रस्ताव देवून गृह प्रकल्पाचे काम सहा महिन्यांत सुरु करण्यावर भर असल्याचे खडसे म्हणाले.
या पत्रकार परिषदेला माजी नगरसेवक प्रा.सुनील नेवे, अॅड.बोधराज चौधरी, रिपाइं उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश मकासरे, जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी, अनिकेत पाटील, प्रा. प्रशांत अहिरे, पुरूषोत्तम नारखेडे, शे.शफी शे.अजीज, अनिकेत पाटील, सुमित बऱ्हाटे, पृथ्वीराज पाटील, लक्ष्मी मकासरे, सविता मकासरे, विजय सुरवाडे, विशाल नारखेडे, हिमांशू दुसाणे, दिनेश नेमाडे उपस्थित होते.