भुसावळ, प्रतिनिधी | शहरातील भाजपा नगरसेवक रवींद्र खरात, त्यांची दोन मुले रोहित उर्फ सोनू, आणि प्रेमसागर तसेच ज्येष्ठ बंधू सुनील बाबूराव खरात व मुलांचा मित्र सुमित संजय गजरे अशा पाच जणांची रविवारी रात्री निर्घृण हत्या करण्यात आली होती. आज (दि.७) त्यांच्या मृतदेहांचे जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर रात्री ७.३० वाजेच्या सुमारास समता नगरातील त्यांच्या घरापासून एकाचवेळी पाच जणांची सजवलेल्या वाहनातून अंत्ययात्रा काढण्यात आली. या अंत्ययात्रेला हजारो समाज बांधवांसह मोठा जनसमुदाय उपस्थित होता. यावेळी पोलिसांची कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला होता. मृतदेह पाहताच कुटुंबियांनी आक्रोश केला. यावेळी उपस्थितांनाही गहिवरून आले होते.
दरम्यान या घटनेमुळे शहरातील शाळा-महाविद्यालयांना अघोषित सुटी
दिसून आली. एकाचवेळी पाच जणांचा निर्घृण खून झाल्यानंतर शहरासह राज्यात खळबळ उडाली आहे. सोमवारी शहरातील शाळा, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर त्यामुळे मोठा परीणाम दिसून आला. काही प्राथमिक शाळांनि तर दुपारी सुटी असल्याचे सांगून विद्यार्थ्यांसह पालकांना माघारी पाठवण्यात आले. मार्केटमध्ये मात्र व्यवहार सुरळीत सुरू असल्याचे दिसून आले.