मुंबई प्रतिनिधी । स्वच्छ भारत सर्वेक्षण २०२० मध्ये भुसावळने ४६ वे तर जळगावने ६४ वे स्थान पटकावले आहे. तर खान्देशातील धुळ्याने मात्र नवव्या स्थानावर मुसंडी मारली आहे.
केंद्र सरकारतर्फे स्वच्छ भारत अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या ‘स्वच्छ भारत सर्वेक्षण २०२०’ चे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. इंदौर देशातील सर्वात स्वच्छ शहर ठरलं आहे. सलग चौथ्यांदा इंदौरने बाजी मारली आहे. गुजरातमधील सूरत दुसर्या क्रमांकावर आहे. तर तिसर्या क्रमांकावर नवी मुंबई आहे. नवी मुंबई तिसर्या क्रमांकाचं सर्वात स्वच्छ शहर ठरलं आहे. ही यादी मोठ्या शहरांसाठी होती. याच्या सोबतीला १ ते १० लाख लोकसंख्या असणार्या शहरांचे मानांकन देखील जाहीर करण्यात आले आहे.
या मानांकनात धुळे शहराने नववे स्थान पटकावले आहे. तर भुसावळ ४६ आणि जळगाव ६४ व्या स्थानावर असल्याचे यातून दिसून आले आहे.भुसावळला सर्वेक्षणामध्ये ३९६२.२ इतके गुण मिळाले आहेत. तर जळगावला या सर्वेक्षणात ३७०२.२ इतके गुण मिळाले आहेत. दोन वर्षांपूर्वी भुसावळने या यादीत शेवटचा क्रमांक मिळवल्याने विरोधकांनी जोरदार टीका केली होती. याची सोशल मीडियातून खिल्ली देखील उडविण्यात आली होती. या पार्श्वभूमिवर यंदा भुसावळ शहराने आपल्या मानांकनात वाढ केल्याचे दिसून आले आहे. तर जळगावची तुलनेत घसरण झाल्याचे दिसून येत आहे.