भुसावळ प्रतिनिधी | तालुक्यातील साकेगाव येथील एका २२ वर्षाच्या तरूणाचा आज सायंकाळी संशयास्पद मृत्यू झाला असून यामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
याबाबत वृत्त असे की, साकेगाव येथील भरत रमेश भोई (वय २२) या तरूणाला रात्री आठच्या सुमारास ग्रामीण रूग्णालयात जखमी अवस्थेत दाखल करण्यात आले. त्याची तपासणी केल्यानंतर डॉ. भालचंद्र चाकूरकर आणि डॉ. नजीमुद्दीन तडवी यांनी त्याला मृत घोषीत केले. या तरूणाला मोठ्या प्रमाणात जखमा झाल्या असून काहींच्या मते तो डंपरखाली आला तर काहींच्या मते त्याच्यावर मातीचा ढिगारा कोसळल्याचे सांगण्यात आले. तर काहींनी त्याचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला आहे.
या घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस स्थानकाचे कर्मचारी हे घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी याबाबत पंचनामा करून प्राथमिक चौकशी केली आहे. दरम्यान, संबंधीत मृत तरूणाच्या पार्थिवाचे उद्या सकाळी शवविच्छेदन होणार असून यातूनच मृत्यूचे कारण समोर येणार आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.