डिझेल चोरांना सिनेस्टाईल अटक : मुक्ताईनगरात थरार !

मुक्ताईनगर-पंकज कपले | भुसावळातून डिझेल चोरी करून मध्यप्रदेशाकडे धुम ठोकणाऱ्या भामट्यांना मुक्ताईनगर पोलिसांनी अगदी सिनेस्टाईल पध्दतीत अटक केल्याची घटना आज घडली आहे.

या संदर्भातील माहिती अशी की, आज पहाटे भुसावळ येथून स्वीफ्टमधून विविध कॅनमध्ये सुमारे चारशे लिटर डिझेल घेऊन काही भामटे पळाले. भुसावळातून ही माहिती मुक्ताईनगर पोलीस स्थानकाचे पोलीस निरिक्षक नागेश मोहिते यांना मिळाली. सदर लोक हे मध्यप्रदेशातील असल्याने ते मुक्ताईनगर मार्गे मध्यप्रदेशातील जातील असा अंदाज मोहिते यांना आली. त्यांनी लागलीच मुक्ताई चौकात कर्तव्यावर असलेले आपले सहकारी गृहरक्षक दलाचे जवान सोपान वंजारी यांना याबाबत माहिती दिली. तसेच त्यांनी तात्काळ मुक्ताईनगर पोलीस स्थानकात हायवे आणि समांतर रस्त्यावरील मुक्ताई चौकाकडे पाठविले.

दरम्यान, चोरटे हे कोणत्याही क्षणाला येतील अशी माहिती असल्याने सोपान वंजारी यांनी प्रसंगावधान राखून तेथून जाणारा एक ट्रक हा रस्त्यावर आडवा लावला. यात अपेक्षेनुसार संबंधीत स्वीफ्ट गाडातील चोरटे हे समांतर रस्त्यावरून वेगाने मुक्ताई चौकात आले. येथे अचानक समोर आडवा लावलेला ट्रक पाहून त्यांनी ब्रेक दाबण्याचा प्रयत्न केला, मात्र यात त्यांना यश आले नाही. आणि त्यांची स्वीफ्ट कार ही आडव्या लावलेल्या ट्रकला आदळून थांबली. अर्थात, सोपान वंजारी यांनी या वाहनातील तिघांना ताब्यात घेतले. पोलीस निरिक्षक नागेश मोहिते यांना मिळालेली माहिती आणि सोपान वंजारी यांच्या प्रसंगावधानामुळे तिघा डिझेल चोरांना अटक करण्यात आली आहे. यामुळे पोलीसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे. या संदर्भात प्रस्तुत प्रतिनिधीने पोलीस निरिक्षक नागेश मोहिते यांना कॉल केला असता त्यांनी या कारवाईची माहिती दिली.

दरम्यान, सदर डिझेल चोरीचा गुन्हा हा भुसावळ तालुका पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडलेला असल्यामुळे यातील तिन्ही संशयितांना भुसावळ तालुका पोलीस स्थानकाकडे वर्ग करण्यात आले आहे.

Protected Content